हॅट्ट्रीक करूनही संजय शिरसाट यांचा पत्ता का कट झाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:17 PM2019-12-31T13:17:13+5:302019-12-31T13:20:55+5:30
मंत्रिमंडळाच्या यादीत असलेले नाव अखेरच्या क्षणी गळाले
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातऔरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता ऐनवेळी कट झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आ. शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिममधून विजयाची ‘हॅट्ट्रीक’ केली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच आ. शिरसाट यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याची चर्चा सुरु होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार आणि पैठणचे ज्येष्ठ आ. संदीपान भुमरे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. आ. भुमरे हे कॅबिनेट तर आ. सत्तार हे राज्यमंत्री झाले.
औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. यापैकी आ. भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल आणि आ. शिरसाट हे पक्षाचे जुने कार्यकर्ते. औरंगाबाद मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांच्यापेक्षा आ. शिरसाट यांचे नाव मंत्री म्हणून आघाडीवर होते. ऐनवेळी अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांनी बाजी मारली. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करुन आ. शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता अधिक होती. मात्र या शक्यतेला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तडा दिला.
मंत्रिमंडळातील समावेशासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून आ. शिरसाट आणि आ. सत्तार यांचे जोरात प्रयत्न सुरु होते. आ. जैस्वाल यांची भूमिका मिळाले तर आनंद नाही मिळाले तरी दु:ख नाही, अशी होती. आ. भुमरे यांचे नाव अधूनमधून चर्चेत होते. मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असे कुणाच्याही मनात नव्हते. आ. शिरसाट यांचा पत्ता कट होण्यामागे नेमकी कारणे काय आहेत. यावरही आता मंथन सुरू झाले आहे. आ. शिरसाट यांचे आमदार झाल्यानंतर पक्षसंघटनेत किंवा पक्षवाढीसाठी मोठे योगदान नसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपच्या संपर्कात असल्याचीही मोठी चर्चा होती. त्याचा फटकाही आ. शिरसाट यांना आता बसल्याची चर्चा आहे. औरंगाबादशी निगडित विकासकामांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करून ते सोडवून घेण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचाही विचार त्यांना मंत्रीपद देताना पक्षाने केल्याचे दिसत आहे. असे असले तरी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाही आ. शिरसाट किंवा आ. जैस्वाला यांना पक्षाने का डावलले, हे शहरातील शिवसैनिकांना न उलगडणारे कोडे आहे.
कार्यकर्त्यांची निराशा
आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात समावेश होणार म्हणून त्यांचे कार्यकर्ते मोठ्या तयारीत होते. सोमवारी अगदी सकाळी मुंबईला निघण्याची तयारीही अनेकांनी केली होती. मात्र आ. शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्याचे पहाटेच कार्यक़र्त्यांना कळाल्याने सर्वांची निराशा झाली.
पक्षाकडून माहितीचे गुप्तपणे संकलन
मंत्रीपदी आमदारांची वर्णी लावण्यापूर्वी शिवसेनेने प्रत्येक आमदाराची गुप्त माहिती घेण्याचे काम केले. यामध्ये शिरसाट यांच्यापेक्षा विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेले अब्दुल सत्तार, पैठणचे आ. संदीपान भुमरे यांचे पारडे जड ठरले. ४अनेक राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामाला बांधील असल्याचे जनतेमध्ये बिंबवले जावे, यासाठी आमदारांनी मागील काळात केलेल्या आलेख आणि पक्षाप्रति असलेली निष्ठा याबद्दलची तपासण्यात आली. भुमरे आणि सत्तार यांच्या कामांचा आलेख चढत्या क्रमाचा होता. त्यामुळे त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.