युवासैनिकांत का झाला वाद? वरुण सरदेसाई जाताच जुने आणि नवे पदाधिकारी आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:22 PM2022-03-30T13:22:29+5:302022-03-30T13:23:32+5:30
एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता.
औरंगाबाद : युवासेनेच्या निश्चय मेळाव्याच्या समारोपानंतर सचिव वरुण सरदेसाई जळगावकडे जाण्यास निघाल्यानंतर, दोन गटांमध्ये मंगळवारी सायंकाळी जबरदस्त राडा झाला. बजाजनगरमधील नियुक्तीवरून नाराज असलेले जुने युवासैनिक नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना पाहताच आमने-सामने आले. दोन गटांमध्ये वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्याला गटबाजीचे गालबोट लागल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
दोन्ही गटांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे रंगमंदिराच्या आवारात अर्ध्या तासाहून अधिक वेळ तणावाचे वातावरण होते. एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता. किरण तुपे, मिथुन व्यास, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ यांनी मध्यस्थी करून राडा मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु नियुक्त्यांवरून संतप्त झालेले कार्यकर्ते कुणाचेही ऐकत नव्हते. या सगळ्या वादामागे ग्रामीण भागात शहरी पदाधिकारी नियुक्त केल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. पदाधिकारी नियुक्त केले कुणी, त्यांना नियुक्तीचा अधिकार आहे की नाही, यावरून दोन गटांमध्ये वेगवेगळ्या चर्चा कानावर येत होत्या. पश्चिम मतदारसंघात नवीन पदे देऊन परस्पर नियुक्त्या दिल्या जात आहेत. ज्यांचे पद काढून दिले ते आणि ज्यांना पद मिळाले ते; असे दोन गट समोरासमोर आल्याने हाणामारीपर्यंत प्रकरण गेले.
नाराज व संतप्त युवासैनिकांनी राडा केला
युवासेनेत ग्रामीण विरुद्ध असा वाद असल्याची चर्चा आहे. बजाजनगर, तिसगाव या परिसरात नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी ते शहरातील आहेत, असा काही पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून हा सगळा खटाटोप करण्यात आल्यामुळे जुने युवासैनिक संतापले होते. शहरातील एकावर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामागे पश्चिम मतदारसंघाचे आमदार यांनीदेखील हातभार लावल्याची चर्चा आहे. तिकडील जिल्हा युवाधिकाऱ्यांवरही युवासैनिक नाराज असल्यामुळे निश्चय मेळाव्यात जाब विचारण्याच्या हेतूने काही पदाधिकारी तिथे आलेले होते. यातच ज्यांना डावलून नियुक्ती करण्यात आली, तर नियुक्त्या करताना एका उपसचिवाची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे नाराज व संतप्त युवासैनिकांनी मंगळवारी राडा केला.
नेमका काय प्रकार आहे, ते जाणून घेऊ
युवासेनेचे विस्तारक निखिल वाळेकर यांनी सांगितले, नेमका प्रकार काय घडला आहे, याची माहिती घेईल. शहरातील पदाधिकाऱ्यांचा त्या घटनेशी काही संबंध नसल्याचे दिसते आहे. ग्रामीण नियुक्त्यांवरून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
...तर सभागृहात झाला असता वाद
निश्चय मेळावा सुरू झाल्यानंतर घोषणायुद्ध सभागृहात सुरूच होते. त्यातच बाल्कनीमध्ये बसलेल्या अनेकांना समजाविण्याचा प्रयत्न काही पदाधिकारी करीत होते. तेथे काही ‘वर-खाली’ प्रकार झाला असता, तर मेळाव्यातच वादाची ठिणगी पडली असती, अशी चर्चा युवा सैनिकांमध्ये ऐकण्यास मिळाली.
आधी वाटले ऋषी विरुद्ध जंजाळ
ऋषिकेश जैस्वाल विरुद्ध राजेंद्र जंजाळ या गटांमध्ये राडा झाला की काय, अशी चर्चा आधी होती, परंतु जंजाळ यांनीच स्पष्टीकरण देत, किरकोळ वाद असल्याचे स्पष्ट केले, तसेच मारहाण करणारे पदाधिकारी युवासेनेचे आहेत की नाहीत, याची माहिती घ्यावी लागेल. अंतर्गत वाद वगैरे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जैस्वाल म्हणाले, आम्ही प्रकरण मिटविण्यासाठी पुढे होतो. त्यामुळे आम्ही वाद केला असे कसे म्हणता येईल?