बसेसमध्ये लवकरच वाय-फाय सेवा
By Admin | Published: May 14, 2017 10:59 PM2017-05-14T22:59:10+5:302017-05-14T23:04:03+5:30
लातूर : एसटी महामंडळाने राज्यातील बसेसमध्ये मोफत वाय-फाय सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : एसटी महामंडळाने राज्यातील बसेसमध्ये मोफत वाय-फाय सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ याअंतर्गत लातूर विभागातील ५०० बसेसमध्ये ही सेवा लवकर उपलब्ध करुन दिली जाणार असून त्यासाठी गुरुवारी मुंबईच्या कंपनीच्या पथकाने सर्व्हेही केला आहे़
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत़ आता महामंडळाने बसमधील प्रवाशांना मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ टप्प्या- टप्प्याने राज्यातील प्रत्येक विभागातील बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे़ ही सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी गुरुवारी मुंबईच्या कंपनीच्या एका पथकाने एसटी महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयास भेट देऊन बसेसची पाहणी केली़
यात कोणत्या प्रकारच्या बसेस आहेत, त्यांची स्थिती कशी आहे, बसेसची संख्या किती आहे तसेच ही सेवा बसविण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, बसेस कोणत्या वेळेत उपलब्ध होऊ शकतात आदी बाबींची पाहणी केली़