बीड बायपासवर रुंदीकरण मोहीम; २३ पैकी ७ मालमत्तांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 01:39 PM2021-03-13T13:39:44+5:302021-03-13T13:40:08+5:30
बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली.
औरंगाबाद : बीड बायपास रोडवर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रुंदीकरण मोहीम राबविली होती. २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी महापालिकेने पाडापाडीला सुरुवात केली. दिवसभरात सात मालमत्ता पाडण्यात आल्या.
बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली. काही मालमत्ताधारकांनी मोहिमेला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बुधवारी (दि. १०) महापालिकेने २३ मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी मार्किंग केले होते. दरम्यान, मालमत्ताधारकांनी स्वतःहून बाधित मालमत्ता काढून घ्याव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव विभागातर्फे पाडापाडी सुरू करण्यात आली. महानुभाव आश्रम चौकाच्या बाजूने रस्त्याने बाधित होणारा मालमत्तांचा भाग दिवसभर पाडण्यात आला. दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. त्यात रफिक खान उस्मान खान, सय्यद मोसीन सय्यद रहीम, शेख रफिक, शेख मुनीर, शकील शेख, मो. अफसर मो. इब्राहिम, इलियास पटेल, इब्राहिम पटेल, शेख कदीर यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.
ही कारवाई महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, शाखा अभियंता संजय चामले, संजय कपाळे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मझहर अली, पी. बी. गवळी, आर. एस. सुरासे, अतिक्रमण हटाव विभागाचे पोलीस निरीक्षक फहीम हाश्मी यांच्या पथकाने केली.