अल्पदरात मिळणाऱ्या रेशन धान्याची बाजारात सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:04 AM2021-07-25T04:04:36+5:302021-07-25T04:04:36+5:30

सय्यद लाल बाजारसावंगी : परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून दिले जाणारे मोफत व अल्प दराचे धान्य शिधापत्रिकाधारकांकडून सर्रासपणे ...

Widespread sale of low priced ration grains in the market | अल्पदरात मिळणाऱ्या रेशन धान्याची बाजारात सर्रास विक्री

अल्पदरात मिळणाऱ्या रेशन धान्याची बाजारात सर्रास विक्री

googlenewsNext

सय्यद लाल

बाजारसावंगी : परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून दिले जाणारे मोफत व अल्प दराचे धान्य शिधापत्रिकाधारकांकडून सर्रासपणे बाजारात विक्री केले जात आहे. गहू, तांदूळ व डाळ खरेदीसाठी भुसार मालाचे व्यापारी व खरेदीदार शिधापत्रिकाधारकांच्या दारोदार जाऊन ही खरेदी करीत आहेत. दुसरीकडे शासनाकडून मिळणाऱ्या धान्याचे महत्त्व काही लोकांना नसून त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याची ग्रामीण भागातील मानसिकता समोर येत आहे.

बाजारसावंगी, दरेगाव, पाडळी, येसगाव, कनकशिळ‌, धामणगाव, बोडखा, लोणी, झरी, वडगाव, सोबलगाव, शेखपुरवाडी, ताजनापूर या गावात लॉकडाऊन असल्या कारणाने गेल्या तीन महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती तीन किलो व दोन किलो तांदूळ या प्रमाणात धान्य वाटप सुरू आहे. तसेच मोफत वाटपपाठोपाठ महिन्याकाठी तीन रुपये प्रतिकिलोने गहू व दोन रुपये प्रतिकिलोने तांदूळ प्रति व्यक्तीप्रमाणे वाटप केले जाते. महिन्यातून दोन वे‌ळेला मिळणारे हे धान्य अर्धेअधिक शिधापत्रिकाधारक स्वतःच्या खाण्यात वापरत नाहीत. तसेच काही शिधापत्रिकाधारक हे मिळालेले गहू व तांदूळ पदरात पडताच काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. दोन किंवा तीन रुपये प्रति किलो मिळणारे धान्य अकरा ते बारा रुपये किलोने विक्री केले जात आहे.

----

दुचाकीवर येतात खरेदीसाठी

भुसार मालाचा छोटा-मोठा व्यवसाय करणारे व्यापारी माल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानाजवळ बस्तान मांडून असतात. रेशनचा माल वाटप झाला की, लागलीच हे लोक गावोगावी व गल्लोगल्ली फिरून जास्त किमतीत माल खरेदी करतात. या व्यापाऱ्यांची ही मोठी साखळी सध्या जिल्हाभरात काम करीत आहे.

---

निकृष्ट धान्य कसे खावे

स्वस्त धान्य दुकानातून विक्री होणारा गहू व तांदूळ हे केव्हातरी चांगल्या प्रतीचा असतो. वेळोवेळी तो नेहमीच निकृष्ट दर्जाचा कुबट वास मारणारा असल्यामुळे आम्ही हा निकृष्ट दर्जाचा गहू व तांदूळ कसा खावा. त्यामुळे आम्ही हे नित्कृष्ट धान्य विक्री करून आम्ही दोन पैसे मिळवित असल्याचे एका शिधापत्रिकाधारकाने सांगितले.

---

प्रत्येक गावात हीच परिस्थिती

जवळपास प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाजवळ गहू व तांदूळ खरेदी-विक्रीचा व्यवहार चालत असून दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनातून हा सर्व माल एकत्रित केला जातो. सर्वांचेच हात काळे असल्याचा आरोप पुंजाजी नलावडे यांनी केला. या सर्व गौडबंगालाची चौकशी होऊन या खरेदी-विक्रीस पायबंद घालावा. खरेदी व विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी होत आहे.

-----

मोफत धान्य वाटपाची जाहिरातबाजी

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मोफत धान्य वाटप सुरू आहे. शासनाकडून या मोफत धान्य वाटपातही जाहिरातबाजी केल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केला. परंतु या मोफत धान्याचा काळाबाजार थांबविला पाहिजे, असेही त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Widespread sale of low priced ration grains in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.