छत्रपती संभाजीनगरात गर्भपाताच्या औषधांची सर्रास विक्री, विक्रेते रंगेहाथ जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:30 IST2024-12-20T19:29:57+5:302024-12-20T19:30:14+5:30

अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारीच गेले डमी ग्राहक बनून : सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Widespread sale of abortion pills in Chhatrapati Sambhajinagar, sellers caught red-handed | छत्रपती संभाजीनगरात गर्भपाताच्या औषधांची सर्रास विक्री, विक्रेते रंगेहाथ जेरबंद

छत्रपती संभाजीनगरात गर्भपाताच्या औषधांची सर्रास विक्री, विक्रेते रंगेहाथ जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : गर्भपातासाठी वापरली जाणारी एमटीपी किट विना प्रिस्क्रिप्शन व अवैधरीत्या विकणाऱ्या दोन मेडिकल चालकांसह एका औषधी होलसेल विक्रेत्याचा गुरुवारी पर्दाफाश झाला. शेख जैद पाशा अयुब पाशा (रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर), संजय पुष्करनाथ कौल (उस्मानपुरा) आणि अभिलाष विजय शर्मा (समर्थनगर) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर गुरुवारी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जैद आणि अभिलाष दोघे मेडिकल चालवतात, तर संजयची औषधांची होलसेल एजन्सी आहे. काही दिवसांपूर्वी अबरार कॉलनीच्या आरफत मेडिकल स्टोअर्सवर गर्भपाताच्या किट सहज उपलब्ध होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. निरीक्षक जीवन जाधव व अंजली मिटकर यांनी स्वत: बनावट ग्राहक बनून आरफत मेडिकल स्टोअर्सवर किटची मागणी केली असता शेख जैदने त्यांना खिशातून किट काढून दिली. त्यासाठी कुठल्याही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागितले नाही. अधिकाऱ्यांनी तत्काळ स्वत:ची ओळख सांगून मेडिकलचा ताबा घेतला.

चौकशीत डिस्ट्रीब्युटर्सचे नाव निष्पन्न
जैदने सदर किट जाधववाडीतील कौल डिस्ट्रीब्युटर्सच्या संजय कौलकडून आणल्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांनी तत्काळ जैदला संजय कौलला फोन करण्यास सांगितले. जैदने कॉल करून संजयला दोन किटची मागणी केली. त्यानुसार संजयने देखील घरपोच देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पथकाने जैदला संजयमार्फत पाठवलेल्या किट देताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.

समर्थनगरमधील अभिलाष तिसरा आरोपी
संजयने किट दिल्याचे पुराव्यासह निष्पन्न झाल्याने त्याला आरोपी करून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. चौकशीत संजयने किट वरद गणेश मंदिराजवळील मेडिकलवाला या दुकानाचा चालक अभिलाष शर्माकडून खरेदी करत असल्याची कबुली दिली. तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी तिघांवरही सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक दिलीप बचाटे अधिक तपास करीत आहेत. तिघांकडेही किटचा मोठा साठा सापडला नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Widespread sale of abortion pills in Chhatrapati Sambhajinagar, sellers caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.