सिल्लोड तालुक्यात सर्वदूर वादळीवाऱ्यासह पाऊस; अनेक घरांवरील पत्रे उडाली, भिंती पडल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:29 PM2023-04-28T18:29:24+5:302023-04-28T18:30:27+5:30
उन्हाळी बाजरी, कांदा सिड्सचे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले
सिल्लोड: तालुक्यात आज दुपारी अजिंठा, भराडी, गोळेगाव, उंडणगाव, शिवना, गेवराई सेमी, आमठाणा, अंभई परिसरासहित आठ ही महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या, अनेक घरांवरील टिन पत्रे उडाली. तर उन्हाळी बाजरी, कांदा सिड्सचे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
याची माहिती मिळताच सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार विक्रम राजपूत, तालुका कृषी अधिकारी न्यानेश्वर बरदे, गटविकास अधिकारी डी. एस. आहिरे यांनी गेवराई सेमी, बाभूळगाव, बंनकीनहोळा परिसरात जाऊन स्वतः नुकसानीची पाहणी केली. या शिवाय तलाठी, मंडळ अधिकारी यांनी ठीकठिकाणी नुकसानीचे पंचनामे केले.
गेवराई शेमी येथिल विनायक ताठे यांच्या राहत्या घराचे ४० टिन पत्रे उडाली, योगेश जगन्नाथ ताठे, विलास ताठे यांच्या राहत्या घराचे ३० ते ४० टिन पत्रे उडाली. उडालेली टिन पत्रे लागल्याने चार जनावरे जखमी झाली. तर एका गायीचा मृत्यू झाला. तालुक्यातील पळशी,के-हाळा, अंधारी,गेवराई सेमी, बाभूळगाव, बंनकीनहोळा कायगाव, टाकळी , भराडी, मोढा, बोरगाव, अनाड, अजिंठा परिसरात अनेक घरांचे टिन पत्रे उडाली. घराच्या भिंती पडल्या, पिकांचे नुकसान झाले. मोढा बु येथील प्रभू साडू ढोरमारे, नारायण सांडू, केशव सांडू याच्या राहत्या घराची पत्रे वाऱ्याने उडाली पिंपळगाव पेठ येथे कैलास रामकृष्ण सांगळे यांचे राहत्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले.