खुलताबादेतील रस्त्यांचे रूंदीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:27 AM2018-12-20T00:27:37+5:302018-12-20T00:27:56+5:30
न.प.चा निर्णय : अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू
खुलताबाद : खुलताबाद शहरातील नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण करून रस्ता अरूंद केल्याने या रस्त्यावर वाहतूक सतत विस्कळीत होत असल्याने पर्यटक व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. बुधवारी या रस्त्याचे मार्र्कींग केल्याने नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबाद शहराचा नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर रहिवासी व दुकानदारांनी पुढे पुढे सरकून रस्ता अरूंद केला आहे. या रस्त्यावरील दर्गेत औरंगजेब यांची कबर तसेच दोन महत्वाच्या दर्गा असल्याने पर्यटक व भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असल्याने अरूंद रस्त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.
खुलताबाद नगर परिषदेत एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आय.ए.एस.अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा कार्यभार असून त्यांच्याकडे नागरिकांनी या रस्त्याच्या बाबतीत लेखी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने बुधवारी नगर परिषदेचे अभियंता पंकज पवार, तेजस भोसले, कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, इरफानोद्दीन खैरोद्दीन, अप्पाराव देवकर, कलीमोद्दीन शेख, गणेश पवार, लक्ष्मण तुपे यांनी या रस्त्यावर मार्किंग केल्याने दुकानदार, व्यापारी व नागरिकात एकच खळबळ उडाली आहे. या मार्गावर अनेक लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांची घरे व दुकाने असल्याने हा रस्त्याचे रूंदीकरण होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.