दवाखान्यात आणले पत्नीला अन् मृत्यू झाला पतीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:48 AM2017-10-13T00:48:18+5:302017-10-13T00:48:18+5:30
आजारी पत्नीला रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले असता पतीचाच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी (दि.११) घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजखेड : आजारी पत्नीला रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले असता पतीचाच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी (दि.११) घडली.
संभाजी एकनाथ लंगडे (४०) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, करंजखेड येथील संभाजी लंगडे यांची पत्नी शोभाबाई संभाजी लंगडे या आजारी असल्यामुळे त्यांनी उपचारासाठी औरंगाबाद गाठले होते. येथे उपचार घेतल्यानंतर उशीर झाल्यामुळे त्यांनी शहरातील आपल्या भाच्याकडेच मुक्काम ठोकला.
मात्र, गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घाटीत दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. हे वृत्त समजताच आप्तस्वकियांनी घाटीत मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजता संभाजी लंगडे यांच्या पार्थिवावर करंजखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, भावजय असा परिवार आहे.
ही दु:खद वार्ता पंचक्रोशीत पसरली आणि लोक मोठ्या संख्येने करंजखेड येथे दाखल होऊन या परिवाराचे सांत्वन करीत होते.