पतीनेच केला पत्नी व मुलीचा खून
By Admin | Published: May 20, 2014 01:23 AM2014-05-20T01:23:24+5:302014-05-20T01:33:16+5:30
पिशोर : आईला मारहाण करून बैलाला चारा टाकायचा म्हणून शेतात नेले व आईसह आम्हाला विहिरीत फेकून दिले.
पिशोर : आईला मारहाण करून बैलाला चारा टाकायचा म्हणून शेतात नेले व आईसह आम्हाला विहिरीत फेकून दिले. नाचनवेल (ता. कन्नड) येथे विहिरीत पडूनही नशीब बलवत्तर म्हणून वाचलेल्या चैतालीच्या जबाबाने पोलीस व महिला दक्षता समितीच्या सदस्याही हेलावल्या. पतीविरुद्ध पत्नी व मुलीच्या खुनाबद्दल पिशोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवार (दि.) १५ रोजी ही घटना उघडकीस आली होती. कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील विनायक शेनफडू ढमाले यांची मुलगी रंजना हिचा विवाह १९९८ साली नाचनवेल येथील विलास श्रीपत गोराडेसोबत झाला होता. लग्नानंतर मुलगा व दोन मुली अशी अपत्ये झाली. गावातीलच कुण्यातरी महिलेसोबत विलासचे संबंध असल्याच्या कारणावरू न पत्नी रंजना संशय घेत होती. विलास हा रंजनाचा शारीरिक व मानसिक छळ करीत असायचा. रविवारी रंजनाबाई हिचे वडील विनायक ढमाले यांनी पिशोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, विलासच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रंजनाचा शारीरिक व मानसिक छळ करून दोन्ही मुलींसह विहिरीत फेकून ठार मारले. मुलगी चैताली हिस जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या गुन्ह्यात तक्रार प्राप्त झाल्याने पती विलास गोराडे विरुद्ध खुनाचा व खुनाचा प्रयत्न करण्याबाबत पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांच्या आदेशान्वये प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला असून विलास गोराडे याला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर) जीव वाचलेल्या चैतालीचा जवाब बचवलेल्या ९ वर्षीय चैताली हिचा इन कॅमेरा जबाब महिला क्षमता समिती सदस्या चंद्रसेनाबाई शेजवळ, महिला शिपाई शेख शिरीन आदींसमोर नोंदविण्यात आला. घरी अनोळखी बाईचा फोन आला. यावरून पप्पाने आईला मारले. रात्री बैलाला चारा टाकायचा म्हणून शेतात नेले व विहिरीत फेकून दिले, असे चैतालीने प्रश्नोत्तर स्वरूपाच्या जबाबात म्हटल्याचे फौजदार वैष्णव यांनी सांगितले.