पदावर पत्नी अन् रुबाब राणाचा !
By Admin | Published: May 29, 2017 12:21 AM2017-05-29T00:21:20+5:302017-05-29T00:21:58+5:30
बीड : जिल्हा परिषदेत आणि त्यांच्याच भाजप पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा पती आपणच सदस्य असल्याचा रूबाब गाजवत सर्वत्र मिरवत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ज्या जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे महिलांना पुढे येऊ द्या, अशी हाक देतात. जिल्हा परिषदेच्या अध्यपदाची जबाबदारी महिलेकडे देऊन याची अंमलबाजवणी झाल्याचे दाखवितात. त्याच जिल्हा परिषदेत आणि त्यांच्याच भाजप पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा पती आपणच सदस्य असल्याचा रूबाब गाजवत सर्वत्र मिरवत आहे. रुबाबात फिरणारा हे दुसरा-तिसरा कोणी नसून विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी मारहाण झालेला बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य राणा डोईफोडे आहे.
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बंधू तथा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर मात करीत जि.प.वर झेंडा फडकाविला होता. परंतु जनेतेने निवडून दिलेल्या आणि जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करणाऱ्या महिलांना आजही स्वातंत्र्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचे पतीच राज करीत असल्याने महिला केवळ नामधारी राहिल्याचे दिसून येत आहे.
अशातच विठाई महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले राणा डोईफोडेवर महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हेच राणा डोईफोडे सध्या भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी सारिका डोईफोडे या पाली जि.प. गटाच्या सदस्या आहेत. निवडणुकीपासून राणा डोईफोडे हे आपण सदस्य असल्याचा आव आणत थाटामाटात जि.प. कार्यक्षेत्रात फिरत आहेत.
कुठलाही कार्यक्रम असो अथवा बॅनरबाजी असो, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्य असा उल्लेख करून प्राचार्य डोईफोडे आपला फोटो लावतो.विशेष म्हणजे याच फोटोवर पालकमंत्र्यांसह खासदार, आमदारांचेही फोटो असतात. पत्नी सदस्य आणि बॅनरवर नाव मात्र प्राचार्य डोईफोडे याचे असूनसुद्धा याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही.
संघटनांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध
राणा डोईफोडे याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच विठाई नर्सिंग महाविद्यालयाची कसून चौकशी करण्यात यावी, येथील विद्यार्थिनींना दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा, विद्यार्थिनींना संरक्षण देण्यात यावे, सर्व मुलींचे जबाब न्यायाधिशांसमोर नोंदविण्यात यावेत, डोईफोडेवर गंभीर गुन्हे नोंद करावेत यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता विद्यार्थी संघटनांसह इतर सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असतानाही राणा डोईफोडे याच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. महाविद्यालयात कमी अन् राजकीय पुढाऱ्यांसोबतच जास्त असतात, अशी चर्चा बीडमध्ये दबक्या आवाजात भाजपच्याच कार्यकर्त्यामध्ये ऐकावयास मिळत आहे.