बायकोला साडी नेसता येत नाही, मला ती पसंत नाही;‘आय क्वीट’ स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:21 PM2022-05-17T13:21:27+5:302022-05-17T13:31:55+5:30
व्हॉट्सॲपवरील स्टेट्स पाहून मित्र भेटण्यासाठी आला आणि घटना उघडकीस आली
औरंगाबाद : मनपसंत बायको न मिळाल्यामुळे नाराज राहणाऱ्या नवविवाहित तरुणाने व्हॉट्सॲपवर ‘आय क्वीट’ असे स्टेट्स ठेवून आत्महत्या केली. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे रविवारी रात्री घडली.
अजय समाधान साबळे (२५) असे मृताचे नाव आहे. तो राजनगर येथे आई-वडील, पत्नीसोबत राहत होता. प्लंबरचे काम करणाऱ्या अजयचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जेवण केल्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला. काही वेळात त्याचा मित्र त्याचे व्हॉट्सॲपवरील स्टेट्स पाहून त्याला भेटण्यासाठी आला. तो त्याच्या खोलीत गेला तेव्हा अजयने गळफास घेतलेला दिसला. घटनेची माहिती तत्काळ मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी अजयला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
लग्न झाल्यापासून राहत होता नाराज
पोलीस सूत्रांनी सांगितले की, अजय लग्नानंतर नाराज होता. तेव्हापासून तो समाजमाध्यमावरील त्याच्या अकाउंटला नेहमी निराशाजनक विचार असलेले स्टेट्स ठेवत होता. त्याच्या मित्रांनी त्याला अनेकदा विचारले; मात्र तो उत्तर देत नव्हता.
सुसाईड नोट पोलिसांच्या हाती
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितले की, मृताच्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तेथेही ती जेवणानंतर स्वत:च्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते. या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.