पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:18 AM2018-08-29T00:18:32+5:302018-08-29T00:20:25+5:30
घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने मृत पावणा-या रुग्णांची संख्याही दखलपात्र आहे.
- राजेश भिसे
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने मृत पावणा-या रुग्णांची संख्याही दखलपात्र आहे. या मृतांचे शवविच्छेदन निवासी वैद्यकीय अधिकारी असलेले व्यक्तीच करीत असल्याचे समोर आले असून, अहवालावर केवळ स्वाक्षरी करण्याचे काम त्यांची पत्नी करीत असल्याचे दिसून येते. पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारीच शवविच्छेदन करीत असल्याचे मंगळवारी पाहणीदरम्यान दिसून आले. यानिमित्ताने घाटी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश आणि बुलडाणा आदी जिल्ह्यांतून रुग्ण येतात. विविध विभागांमार्फत रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. अपघात इमारतीमध्ये दररोज अपघातग्रस्त वा नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तींना दाखल केले जाते. अत्यवस्थ रुग्णासही दाखल करून घेतले जाते. उपचारास प्रतिसाद मिळाला तर या रुग्णास जीवदान मिळते. मात्र, प्रतिसाद न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होते. मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याचे कारण स्पष्ट केले जाते.
घाटी रुग्णालयात स्वतंत्र शवविच्छेदन विभाग कार्यरत आहे. यामध्ये कर्मचा-यांसह हाऊस आॅफिस पदावरील व्यक्ती कार्यरत आहेत. शवविच्छेदन करण्याचे काम हाऊस आॅफिस पदावरील व्यक्तीचे असते; पण या पदावरील महिला ही शवविच्छेदन न करता त्यांचे पतीच ते करीत असल्याचे मंगळवारी दिसून आले. डॉ. विकास राठोड हे घाटी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी राठोड या हाऊस आॅफिस म्हणून कार्यरत आहेत.
शवविच्छेदन प्रक्रियेत डॉ. अश्विनी राठोड यांचा मंगळवारी कुठेही सहभाग दिसून आला नाही. शवविच्छेदन अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी त्या सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात आल्या, तर मंगळवारी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत जवळपास ७ ते ८ मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. ते कोणी केले, अशी विचारणा शवविच्छेदन विभागातील कर्मचा-यांकडे केली असता त्यांनी डॉ. विकास राठोड यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. ते निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना शवविच्छेदन कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घाटी रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ कसे?
गत चार ते पाच महिन्यांपासून घाटी रुग्णालयात डॉ. विकास राठोड हेच मृतांचे शवविच्छेदन करीत असून, शवविच्छेदन अहवालावर स्वाक्षरी मात्र त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी राठोड करीत आहेत. या प्रकाराबाबत घाटी रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ कसे राहू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्तव्यावर असताना शवविच्छेदन
निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून मंगळवारी डॉ. विकास राठोड हे कर्तव्यावर असताना शवविच्छेदन करण्यास ते कसे गेले, हे एक कोडेच आहे. फॉरेन्सिक विभागाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असला तरी सध्या जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकारी पदाची आहे. या पदावरील व्यक्ती शवविच्छेदन करू शकते का, याचे उत्तर घाटी रुग्णालय प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज
शवविच्छेदन विभागाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सीसीटीव्हीचे मंगळवारचे फुटेज तपासून असे प्रकार रोखण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांतून होत आहे.