पत्नी गेली माहेरी, नांदायला परत यावी म्हणून फोटो व्हायरल करून केली बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 07:25 PM2021-09-23T19:25:27+5:302021-09-23T19:30:49+5:30
cyber crime in Aurangabad : नांदायला येण्यासाठी पतीकडून पत्नीची सोशल मीडियावर बदनामी
औरंगाबाद : घरातील वादातून पत्नी माहेरी राहण्यासाठी गेली. ती पुन्हा नांदण्यासाठी यावी, यासाठी सोशल मीडियावर पत्नीचा फोटो टाकून त्यावर अश्लील मजकूर लिहिणाऱ्या पतीला ग्रामीण सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुकुंदवाडी भागातील एका परिसरात राहणाऱ्या नंदिनी (नाव बदललेले आहे) या ३५ वर्षांच्या असून, त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा पती चारित्र्यावर संशय घेऊन घरात तिला सतत मारहाण करीत होता. दररोजची मारहाण व वादाला कंटाळलेल्या नंदिनी सहा महिन्यांपूर्वी सासर सोडून माहेरी आल्या. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी अर्जही दाखल केला आहे. त्यावर निर्णय प्रलंबित आहे. याच कालावधीत सोशल मीडियावर नंदिनी यांचे वैयक्तिक छायाचित्र टाकून त्यावर अश्लील मजकूर लिहिला जात होता. हा प्रकार सतत होत होता, तसेच अश्लील मजकुरासह छायाचित्रे नातेवाइकांना पाठविण्यात येत होती. हा प्रकार दररोज घडू लागल्यामुळे त्यांनी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत १५ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - स्वस्त इंधनाकडे वाढता कल; सीएनजी कारसाठी औरंगाबादकर वेटिंगवर
पोलिसांनी बारकाईने तांत्रिक तपास केल्यानंतर नंदिनीचा फोटो सोशल मीडियात प्रसारित करणारा तिचा पतीच निघाला. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीने अनेक खुलासे केले आहेत. पत्नी माहेरी गेल्यामुळे अस्वस्थ होतो. पत्नीची नातेवाईक आणि साेशल मीडियात बदनामी केल्यास ती पुन्हा नांदायला येईल, तसेच नातेवाइकांनाही अद्दल घडेल, यासाठी पत्नीचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याची कबुली पतीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र निकाळजे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हवालदार कैलास कामठे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाय, लखन पचोळे, योगेश दरवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा
आरोपीकडून मोबाइल जप्त
आरोपी पतीकडून गुन्ह्यात बदनामीसाठी वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाइल तपासणीतून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती निरीक्षक निकाळजे यांनी दिली.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह