अहो! भावाला राखी बांधून आली; लग्नानंतर सहाव्या दिवशी नववधू गायब, दलाल महिलाही फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:15 AM2021-09-01T10:15:00+5:302021-09-01T10:15:10+5:30
औरंगाबादमधील घटना
वाळूज महानगर (जि. औरंगाबाद) : नोटरी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सहाव्या दिवशी भावाला राखी बांधून येते, असे सांगून पतीसह माहेरी आलेली नववधू गायब झाली. विशेष म्हणजे, लग्न जुळविणाऱ्या दोन दलाल महिलाही फरार आहेत. संतोष उत्तम बोडखे (३२, रा. नेवासा) याचा कापड विक्रीचा व्यवसाय आहे. पंढरपुरातील सुमनबाई साळवे आणि अंजली पवार यांच्या मध्यस्थीने शुभांगी प्रभाकर भोयर (२५ रा. रामनगर, एन.२, सिडको) हिच्याशी विवाह पार पडला. मागणीप्रमाणे दोन लाख रुपये दोघींना दिले. सध्या त्यादेखील फरार आहेत.
राखी पौर्णिमेचा बहाणा
नेवासा येथे २४ ऑगस्टला संतोष व शुभांगी यांचा मंदिरात हिंदू पद्धतीने विवाह झाला. लग्नात तिला मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील चैन आदी जवळपास ४० ते ५० हजारांचे दागिने घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभांगीने राखी पौर्णिमेस माहेरी जाते, असा हट्ट धरल्याने संतोषने तिला पंढरपुरात सुमनबाई साळवे हिच्या घरी सोडले व तो नेवाशाला निघून गेला. मध्यरात्रीच्या सुमारास शुभांगी घरातून गायब झाली. संतोष व त्याच्या नातेवाईकांनी शुभांगीचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही सापडली नाही.