बायको सतत पैसे मागायची, त्याने ऐतिहासिक समईसह झुलेलाल मंदिरातील मूर्ती पळवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:55 PM2021-12-08T17:55:56+5:302021-12-08T17:56:34+5:30
crime in Aurangabad : शहागंजातील येथील चोरीच्या घटनेत सिटी चौक पोलिसांनी आरोपीला अवघ्या ५ तासांमध्ये बेड्या ठोकल्या
औरंगाबाद : बायकोला पैसे देण्यासाठी शहागंजमधील सिंधी बांधवाचे कुलदैवत श्री झुलेलाल साई यांच्या वरुणदेव जलाश्रम मंदिरातील दोन चांदीच्या मूर्ती, समई आणि दानपेटी चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरट्याने लंपास केल्या होत्या. सिटी चौक पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला बेड्या ठोकत चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
जावेद जुम्मा पठाण (३०, रा. नवाब जानी मशिदीच्या मागे, चेलीपुरा) यास पोलिसांनी अटक केली. त्याचे पत्नीसोबत पैशांवरून वाद होते. पत्नी सतत पैसे मागत होती. त्यातच जावेद यास व्यसन करण्याची सवय होती. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून पैसे मिळविण्याच्या शोधात होता. त्याने यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नसल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याने पैसे मिळविण्यासाठी श्री झुलेलाल साई मंदिरातील दानपेटी चोरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने शनिवारी मध्यरात्री दीड वाजता मंदिराचे कुलूप तोडून चांदीच्या दोन मूर्ती, समईसह दानपेटी लंपास केली. सिटी चौक पोलिसांनी जावेदकडून हा सर्व मुद्देमाल जप्त केला तसेच दानपेटीमध्ये असलेले ४ हजार ४६० रुपयेही हस्तगत केले आहेत.
सिंधी बांधवांचे कुलदैवत असल्यामुळे निरीक्षक गिरी यांनी तत्काळ तपासाच्या सूचना देऊन पथके रवाना केली. दुय्यम निरीक्षक अशोक भंडारे यांनी तांत्रिक पुराव्यांवरून अवघ्या पाच तासांच्या आत जावेद पठाणला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन मंदिरातून चोरलेल्या मूर्ती व मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. ही कामगिरी निरीक्षक गिरी, भंडारे, सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, जमादार सय्यद शकील, व्ही. पी. काळे, शेख गफ्फार, मजिद पटेल, राजपूतबाई, देशराज मोरे, राऊत, काझी शायकोद्दीन यांनी केली. अधिक तपास उपनिरीक्षक भगवान मुजगुले करत आहेत. श्री झुलेलाल साई मंदिरात चोरी करणाऱ्या जावेद पठाण यास न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.