औरंगाबाद जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; आरोपी पती अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:14 PM2018-09-06T16:14:49+5:302018-09-06T16:14:49+5:30
जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली.
औरंगाबाद : जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ५ ) रात्री फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण येथे घडली. कांताबाई दादाराव दाढे ( २७ ) असे मयत महिलेचे नाव असून दादाराव अण्णासाहेब दाढे (३५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गत आठवड्यातील सताळ पिंप्री येथील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद - जळगाव राज्य मार्गावरील नायगव्हाण शिवारातील शेत वस्तीवर दाढे कुटुंब मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. या ठिकाणी दादाराव दाढे यास आठ एकर जमिन आहे. येथेच एका कूड पञ्याच्या खोलीत ते राहतात. बाजूलाच काही अंतरावर त्याचा मोठा भाऊ राहतो. बुधवारी रात्री दाढे कुटुंब जेवण करीत असताना दादाराव याने दारुच्या नशेत तर्रर्र होऊन पत्नी कांताबाई सोबत वाद घातला. यानंतर दादारावने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. काठीने बेदम मारहाण केल्याने ती जागीच बेशुद्ध होऊन कोसळली. मारहाण केल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली की झोपी गेली याचे साधे भानसुद्धा दादारावला नव्हते, तो तेथेच झोपी गेला.यावेळी त्यांची लहान मुलेही झोपी गेली होती.
काही वेळाने एका मुलास जाग आल्याने त्याने आईस उठवण्याचा प्रयत्न केला असता ती शुद्धीवर आली नाही. त्याने दारुच्या नशेत झोपलेल्या दादारावला उठवले. दादारावने पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तीने हालचाल केली नाही. याची माहिती नातलगांना व शेजाऱ्यांना मिळाल्याने ते जमू लागले. १०८ रुग्ण वाहिकेला फोन करुन घटनास्थळी बोलावण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास वडोदबाजार ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी कर्मचाऱ्यां समवेत घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत कांताबाई हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे दुपारी बर्याच वेळाने शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. ज्या लाकडी काठीने त्याने पत्नीला मारहाण करून यमसदनी पाठवले ती काठी पोलिसांनी ताब्यात घेतली.