वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:48 PM2018-05-25T23:48:11+5:302018-05-25T23:49:03+5:30
पाणवठे कोरडेठाक; डोंगरही बोडखे : उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाची दमछाक
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यासह अजिंठ्याच्या डोंगरात पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. उन्हामुळे डोंगर बोडखे झाले असून चोहीकडे पाण्याचा ठणठणाट आहे. वन्यप्राण्यांना थांबण्यासाठी सावली नाही. डोंगरात पिण्यासाठी पाणी नाही. उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाच्या नाकात दम आला आहे.
मागील आठवड्यात शिरसाळा तांडा परिसरात एका बिबट्याचा अन्न -पाण्याविना तडफडून मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. पाण्यासाठी वन्यप्राणी रस्त्यावर, गाव वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकून वन विभाग वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे, पण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही तर वन्यप्राण्यांची संख्या घटल्यास आश्चर्य वाटू नये.
अजिंठा डोंगरात बिबट्या, अस्वल, हरण, मोर, लांडगा, नीलगाय, तडस, पशू पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. सिल्लोड, अजिंठा, सोयगाव वन परिक्षेत्रातील सर्वच जंगलात उन्हामुळे पानगळ झाली आहे. याचा फटका वन्यप्राण्यांना बसला आहे.
सिल्लोड वन परिक्षेत्रात १ हजार ५९ हेक्टर, अजिंठा वनपरिक्षेत्रात ९ हजार हेक्टर, सोयगाव ९ हजार हेक्टर असे एकूण १९ हजार हेक्टर परिक्षेत्र आहे. त्यातील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहे. मानवी वस्त्यांकडे आलेल्या अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हरणांचे लचके तोडले आहे. नीलगाय, हरण विहिरीत पडत आहे.
३४ कृत्रिम पाणवठ्यात टँकरचे पाणी
वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये, यासाठी वन विभागाने सिल्लोड परिक्षेत्रात पिंपळगाव घाट, चिंचवण, शिंदेफळ, धावडा, पळशी परिसरात ५ पाणवठे तयार केले आहेत. अजिंठा वन विभागाने अजिंठा, नाटवी, जळकी, वसई, जामठी, हिंगणा, फर्दापूर, ठाणा, देव्हारीच्या जंगलात २० कृत्रिम पाणवठे तर सोयगाव तालुक्यात ९ पाणवठे तयार केले आहेत. त्यात आता टँकरद्वारे पाणी टाकून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वन विभाग करताना दिसत आहे. अजिंठा, सिल्लोड, सोयगाव परिक्षेत्रात एकूण ३४ कृत्रिम पाणवठे तयार केले असून यात टँकरने नियमित पाणी टाकले जात आहे. यामुळे प्राण्यांची तहान काही अंशी भागत आहे, अशी माहिती अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे, सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. दहिवाल, सोयगावचे शिवाजी काळे यांनी दिली. यासाठी दरमहा १ लाख ६३ हजार रुपये पाण्यावर खर्च होत आहे.
४ लाख १४ हजार रोपे जगविली
अजिंठ्यात भीषण पाणीटंचाई असताना नर्सरीसाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन अजिंठा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा करून अजिंठा वन विभागाने ४ लाख १४ हजार रोपे जगविली. यामुळे आज ही रोपवाटिका हिरवीगार दिसत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे यांनी दिली.