वन्यजीव सप्ताहात सर्पमित्र पाठक यांना कोब्राचा दंश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 11:10 AM2017-10-08T11:10:44+5:302017-10-08T11:11:05+5:30
साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवीत असतानाच एका कोब्रा जातीच्या नागाने सर्पमित्र असलेल्या डॉ. किशोर पाठक यांना दंश केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वनविभागाच्या कार्यालयातच घडली. डॉ. पाठक यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद, दि. ८ : साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवीत असतानाच एका कोब्रा जातीच्या नागाने सर्पमित्र असलेल्या डॉ. किशोर पाठक यांना दंश केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वनविभागाच्या कार्यालयातच घडली. डॉ. पाठक यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
शनिवारी वन्यजीव सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम उस्मानपुरा येथील वनविभागाच्या कार्यालयात चालू होता. यावेळी डॉ. पाठक हे वनअधिकारी व कर्मचा-यांना साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवित होते. सर्पमित्राने दोन दिवसांपूर्वी पकडून आणलेला कोब्रा नाग डॉ. पाठक यांनी प्रात्यक्षिकासाठी निवडला. साप कसा पकडावा व काय खबरदारी घ्यावी, यावर कर्मचा-यांना मार्गदर्शन सुरू होते. सापाला काठीच्या मदतीने अनेकवेळा पकडण्यात आले होते. त्यामुळे साप काहीसा चवताळला होता. डॉ. पाठक हे सापाचे तोंड पकडण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात सापाने त्यांच्या डाव्या हाताला दंश केला.
रक्तस्राव अधिक...
कोब्राचे विष शरीरात पसरू नये म्हणून पाठक यांनीदेखील खबरदारी घेतली. सर्पमित्र सुभाष राठोड यांनी त्वरित प्राथमिक उपचार केले. वन्य अधिका-यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले. खूप रक्तस्रावही झालेला आहे. अतिदक्षता विभागात पाठक यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. वन्यजीव सप्ताहात सर्पमित्राला कोब्राचा दंश
त्यांनीच जीवदान दिलेल्या कोब्राचा दंश
डॉ.पाठक यांनी गेल्या काही दिवसात अनेक विषारी सापांना पकडत त्यांना जंगलात सुरक्षित सोडले होते. मागे कुबेर गेवराई परिसरातील एका घरातून त्यांनी कोब्रा जातीचा साप पकडला होता. या कार्यक्रमात त्यांनी तोच कोब्रा प्रात्यक्षिकासाठी आणला होता.