गॅस्ट्रोने हाहाकार उडण्याची प्रशासन वाट पाहतेय का...?; औरंगाबाद मनपात नगरसेवकांचा संतप्त प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 01:45 PM2017-11-16T13:45:45+5:302017-11-16T13:50:07+5:30
शहरातही गॅस्ट्रोसारखी साथ पसरून हाहाकार उडावा याची वाट प्रशासन बघतेय का...? असा संतप्त सवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.
औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे छावणीत गॅस्ट्रोची साथ पसरली. रुग्णांचा आकडा चार हजारांपर्यंत गेला. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये परिस्थिती खूप चांगली नाही. विविध वसाहतींना तब्बल सहा ते आठ महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होतोय. शंभर तक्रारी केल्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी अजिबात दखल घेत नाहीत. शहरातही गॅस्ट्रोसारखी साथ पसरून हाहाकार उडावा याची वाट प्रशासन बघतेय का...? असा संतप्त सवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आठ दिवसांचे आणि शेवटचे अल्टिमेटम महापौरांनी अधिका-यांना दिले.
सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावर चर्चा घेण्याचे निश्चित होताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील समस्यांचा पाढाच वाचायला सुरुवात केली. नगरसेविका माधुरी अदवंत यांनी तर वॉर्डात पन्नास मिनिटे पाणी न आल्यास मनपासमोर उपोषण करण्याचे जाहीर करून टाकले. जुन्या शहरात पाण्याची अधिक बोंबाबोंब असल्याने शहागंज येथे पाणी साठविण्यासाठी नवीन हौद बांधण्यात यावा, अशी मागणी सरवत बेगम यांनी केली. अज्जू नाईकवाडी यांनी एन-५ पाण्याच्या टाकीला छत नसल्याने पाण्यासोबत कबुतर व इतर पक्ष्यांचे पंख येत असल्याचे नमूद केले.
शिल्पाराणी वाडकर यांनी पाण्याच्या टाक्या भरत नसल्याची तक्रार केली. हाजी इर्शाद यांनी वॉर्डात ड्रेनेजचे दूषित पाणी सहा महिन्यांपासून येत असल्याची तक्रार केली. सीमा खरात, सीमा चक्रनारायण, बन्सी जाधव यांनी पाणी प्रश्न मांडला. रेश्मा कुरैशी यांनीही दूषित पाण्याची तक्रार केली. राज वानखेडे यांनी हर्सूल भागात पाण्याची टाकी बांधून तलावाचे पाणी या भागातील वॉर्डांना द्या, कीर्ती शिंदे यांनी जायकवाडीहून जास्त पाणी आणण्यासाठी नियोजन करण्याची सूचना केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी येणाºया आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करावा, दूषित पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावावा, असे आदेश कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना दिले.
घाटीमध्ये गॅस्ट्रोच्या २० रुग्णांवर उपचार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल अर्थात घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांत गॅस्ट्रोच्या २० रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रत्येक महिन्याला रुग्णालयात सरासरी २० ते २५ रुग्ण दाखल होत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. छावणी परिसरातील हजारो लोकांना एकाच वेळी गॅस्ट्रोची लागण झाली. या भागातील रुग्णांनी छावणी सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यावर भर दिला. उपचारासाठी या भागातून रुग्ण घाटीत आले नाहीत; परंतु २० रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्ण अन्य भागातील असल्याची माहिती घाटीतर्फे देण्यात आली. घाटीत प्रत्येक महिन्याला गॅस्ट्रोचे किमान २० रुग्ण दाखल होतात.