भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:06 PM2019-12-10T18:06:38+5:302019-12-10T18:09:37+5:30

विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

Will BJP's city president and district president change inAurangabad district ? | भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा

औरंगाबाद : राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नवीन कार्यकारिणीसाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. संघटनात्मक बांधणीसह नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेतल्यानंतर भाजपचा शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार या चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

भाजपच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला माजी राज्यमंत्री आ. अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बुथ समिती, मंडळ नेमणुका केल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी बुथ समितीचे गठन लवकर केले जावे, असे आदेशही दिले.

या बैठकीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण होणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही महिन्यांतच शहरातील महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी शहराध्यक्षाला प्रचंड महत्त्व असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बनण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. शहराध्यक्ष पद हे पक्षातील निष्ठावंत व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा भाजपतील काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत आणि इतर पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये गटबाजी होण्याची शक्यता आहे.

अगोदर युती, आता कोणती आघाडी होणार?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युतीच्या नावावर मते मागितली. मतदारांनाही शहारातील तिन्ही जागांवर युतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले. मात्र आता शिवआघाडीऐवजी दुसरीच आघाडी शिवसेनेने केली असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will BJP's city president and district president change inAurangabad district ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.