इंग्रजी शाळांच्या पायाभूत सुविधा तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:25 PM2019-07-23T23:25:00+5:302019-07-23T23:25:14+5:30
जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
औरंगाबाद : जिल्ह्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. अनेक शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा नाहीत. सुरक्षित इमारती नाहीत. सुरत येथील कोचिंग क्लासेसच्या घटनेत अनेक निष्पाप मुलांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सदस्य अविनाश गलांडे यांनी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात तीन-तीन मजली इमारतींमध्ये इंग्रजी शाळा सुरू आहेत. त्यामध्ये मुलांना दाटीवाटीने बसविले जाते. मुलांच्या दृष्टीने शाळांच्या इमारती सुरक्षित आहेत का? शाळेत एखादी दुर्दैवी घटना घडली, तर संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग आहे क ा? मागील काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील सुरत येथे कोचिंग क्लासेसला आग लागली. तेव्हा मुलांनी जीव वाचविण्यासाठी वरच्या मजल्यावरुन उड्या मारल्या. त्या घटनेत अनेक मुलांना जीव गमवावा लागला.
या घटनेनंतर आपल्या जिल्ह्यातील शाळा इमारती सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत का? याची तपासणी शिक्षण विभागाने करण्याची गरज होती. याबाबत मागील बैठकांमध्ये विचारणा करण्यात आली होती.
त्यावर काय कार्यवाही झाली. तेव्हा शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले की, जिल्ह्यात जवळपास १३०० इंग्रजी शाळा आहेत. या शाळांच्या तपासणीबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या. अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर म्हणाल्या की, माझ्या स्वाक्षरीचे पत्र सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले जाईल व शाळा सुरू करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व निकषांची तपासणी केली जाईल.
रमेश गायकवाड यांनी ‘आरटीई’नुसार प्रवेशामध्ये गैरव्यवहार होत आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एक किलोमीटरच्या आत आंतर असलेल्या मुलांना ‘आरटीई’ अंतर्गत शाळेत प्रवेश मिळत नाही आणि शाळेपासून ४-५ किलोमीटर अंतरावर राहणाºया मुलांना प्रवेश मिळतो. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ९२७ जागा रिक्त राहिल्या होत्या. याबाबत पालकांमध्ये असंतोष असून, या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा झाली पाहिजे.