नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा 'ठाकरी बाणा' मुख्यमंत्री दाखवतील का? भाजपचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 06:06 PM2022-02-24T18:06:17+5:302022-02-24T18:10:50+5:30
भाजपाचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे यांचा सवाल
औरंगाबाद: ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thakarey ) दाखवणार का, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणिस आ. अतुल सावे ( Atul Save) आज पत्रकार परिषदेत केला.
आ. सावे पुढे म्हणाले, नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे 'ईडी'कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे, याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल, असा इशाराही आ. सावे यांनी दिला.
तसेच मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिम मतांसाठी सुरु असलेले हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल, असा दावा आ. सावे यांनी केला. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता. राम बुधवंत आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप आंदोलकांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली.