फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? विज्ञान-धर्माची सांगड घालणाऱ्यांना कन्हैयाकुमारचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:04 PM2022-06-02T19:04:22+5:302022-06-02T19:05:05+5:30
सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे.
औरंगाबाद : सत्याचा गळा घोटू देऊ नका, सदैव सत्याच्याच बाजूने उभे रहा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी बुधवारी येथे केले. ते निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया’ या पुस्तकाचे तापडिया नाट्यगृहात प्रकाशन करताना बोलत होते. खा. कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते.
कन्हैयाकुमार म्हणाले, आज सत्य सांगण्यासाठी डिस्क्लेमर द्यावे लागत आहे. देशभक्त होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे. लोकशाही व संविधान गृहीत धरले जात आहे. देशासमोरचे ज्वलंत प्रश्न वेगळेच आहेत. ४७ कोटी लोकांनी रोजगार मिळत नाही म्हणून रोजगार शोधणेच बंद करून टाकले आहे. आज प्रतीकांचा वापर करून समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे. विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जात आहे. पण फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुमार केतकर म्हणाले, कुठलाही पुरावा नसताना भारतात ३२ लाख लोक जेलमध्ये सडताहेत, याची कधी चर्चा होत नाही. याचा अर्थ आपल्याला सत्याची जाण नाही. आपण किती बेपर्वा आहोत, आपल्यातच किती मश्गूल आहोत, हे यातून दिसतंय. काय झालं नाही ना, हे पुरेसं अशी मनोवृत्ती बळावत चालली आहे. या देशात ५५ कोटी मध्यमवर्ग आहे. त्यांचे पगार चालू आहेत. त्यांचे बोनस चालू आहेत. त्यामुळे त्यांना महागाईबद्दल काही वाटत नाही. भारतात हिंदुत्वाच्या गुढ्या उभारण्यासाठी विदेशातील हिंदूंचा पैसा येतो, असा आरोपही त्यांनी केला. प्रा. जयदेव डोळे यांचेही यावेळी भाषण झाले. नील नागवेकर, कृष्णा साळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लेखक निरंजन टकले यांनी प्रास्ताविक केले. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांनी आभार मानले.