दळणवळणासह पायाभूत सुविधांवर भर देणार : इम्तियाज जलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 07:46 PM2019-05-28T19:46:24+5:302019-05-28T19:48:08+5:30
जुन्या खासदाराप्रमाणे मनपात लुडबूड करणार नाही
औरंगाबाद : शहरात उद्योगधंदे आणि पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी विमान वाहतूक सेवा, रेल्वे सेवा, दर्जेदार रस्ते, पाणी आदी पायाभूत सोयीसुविधांवर अधिक भर द्यावा लागणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील २० वर्षांमध्ये विकास कामच झाले नाही. सध्या विकास कामे करण्यासाठी बरीच संधी आहे. शहरात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.
मागील काही वर्षांपासून औरंगाबादेतील मतदारांना बदल हवा होता. मुस्लिम-दलित मतांशिवायही अनेक नागरिकांनी मला मतदान केले आहे. ज्या विश्वासाने नागरिकांनी मला निवडून दिले त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यात येईल. विमान सेवेची सध्या वाईट अवस्था आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी प्रत्येकी एकच विमान आहे. स्पाईस जेट, इंडिगो कंपन्यांना उद्या दिल्लीत जाऊन विमानसेवा वाढवावी म्हणून निवेदन देणार आहे. रेल्वे दळणवळणाच्या सोयीही कमीच आहेत. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसायचे. नंतर मराठवाड्यावर पुन्हा अन्याय हे ठरलेले आहे. त्यासाठी अगोदरच प्रयत्न करायला हवेत.
शहरी, ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहरात जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत पाणी आणण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येतील. सध्या येणाऱ्या पाण्याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे. आठ दिवसांपासून शहराची शांतता भंग करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. भडक वक्तव्य, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत. चंद्रकांत खैरे यांनी मोठे भाऊ म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावे. त्यांनी आदेश द्यावे, त्यांचे उर्वरित कामेही पूर्ण करण्यात येतील. हिंदूंची सुरक्षा करणार असे सांगितल्या जात आहे. मी या जिल्ह्याचा खासदार असून, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही माझी तेवढीच जबाबदारी आहे.
पाणी चोरांवर कारवाई करा
शहरात अनधिकृत नळांची संख्या खूप आहे. पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोणीही चुकीचे काम करीत असल्यास पोलिसांनीही कारवाई करावी, असेही इम्तियाज जलील यांनी नमूद केले. तुमच्या व्यासपीठावर दंगलीतील आरोपी बसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून देताच त्यांनी सोयीने उत्तर देण्याचे टाळले. अवैध नळ कनेक्शनवरून राजाबाजार भागात दंगल उसळल्याची आठवणही त्यांना करून देण्यात आली.
रस्त्यांची यादी अंतिम करावी
३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. मनपा आयुक्तांनी आजपर्यंत यादीच अंतिम केली नाही. महापौरांनी यादीत अत्यावश्यक रस्त्यांचीच नावे टाकावीत. मी मनपाच्या कारभारात पूर्वीच्या खासदाराप्रमाणे अजिबात लुडबूड करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.