"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल!

By मुजीब देवणीकर | Published: September 2, 2024 08:22 PM2024-09-02T20:22:30+5:302024-09-02T20:23:08+5:30

अठरा पगड जातींसाठी केंद्राची योजना असल्याची अफवा; महापालिकेच्या प्रकल्प विभागात शिलाई मशीन मिळणार या आशेने हजारो महिला अर्ज भरण्यास गर्दी करीत आहेत.

"will get a free sewing machine"; 20,000 applications filed in the Chhatrapati Sambhajinagar municipal corporation only by rumour! | "मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल!

"मोफत शिलाई मशीन मिळणार"; अफवेनेच महापालिकेत २० हजार अर्ज दाखल!

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या योजनेत १८ पगड जातीच्या नागरिकांना आपला पारंपारिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी कर्जही देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महिलांचे लोंढे महापालिकेत दाखल होत आहेत. शिलाई मशीन द्या, अशा आशयाचे तब्बल २० हजार अर्ज प्राप्त झाल्याने महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही अवाक झाले. मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणीतरी पसरवली. ४०० ते ५०० रुपये प्रत्येकी खर्च करून महिला अर्ज भरत आहेत.

महापालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या योजना याच विभागामार्फत सुरू आहेत. कोरोनानंतर हातगाडीवर साहित्य विक्रेत्यांना १० ते ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले. त्याच पद्धतीने दुसरी योजना केंद्राने आणली आहे. या योजनेत १८ पगड जातींच्या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना अगोदर डीआयसीमार्फत प्रशिक्षण दिले जाईल. दररोज ५०० रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाईल. दुसरे प्रशिक्षण १५ दिवसांचे राहील. त्यातही ५०० रुपये भत्ता राहील. व्यवसाय करण्यासाठी किट दिले जाणार आहे. या शिवाय १ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के व्याजाने कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाची परतफेड केल्यास २ लाख रुपये दुसरे कर्ज मिळेल. महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जांची शहानिशा करावी, तपासणी करावी आणि मंजुरीसाठी पुढे सादर करावेत.

१८ पगड जाती कोणत्या?
कुंभार, सुतार, लोहार, चांभार, माळी, तेली, न्हावी, परीट-धोबी, बोट बनविणारा, शस्त्र कारागिर, कुलूप तयार करणारा-दुरुस्ती करणारा, सोनार, शिल्पकार-दगड कोरणारा, गवंडी, बास्केट-चटई-झाडू बनविणारा-कॉयर विणकर, बाहुली-खेळणी बनविणारा, शिंपी, मासे पकडायचे जाळे बनविणारा.

शिंपी प्रवर्गात अर्ज
शिंपी प्रवर्गात महापालिकेकडे २० हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जावर मोफत शिलाई मशीन द्यावी, असा उल्लेख महिलांनी केला आहे. अन्य प्रवर्गात ५ हजार अर्ज आले आहेत. मुळात योजनेत शिलाई मशीन देण्याचा कुठेच उल्लेख नाही.

पुण्याहून आली महिला
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी आणि पुणे येथे सासर असलेली एक महिला शुक्रवारी सकाळी महापालिकेत दाखल झाली. खास अर्ज भरण्यासाठी पुण्याहून आल्याचे तिने सांगितले.

अफवा कोणी पसरवली माहीत नाही
महापालिकेच्या प्रकल्प विभागात अर्ज केल्यानंतर शिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणी पसरविली माहीत नाही. दररोज हजारो महिला अर्ज दाखल करीत आहेत. महिलांना रोखण्यासाठी अनेकदा सुरक्षा रक्षक तैनात करावे लागत आहेत.
- अंकुश पांढरे, उपायुक्त मनपा.

Web Title: "will get a free sewing machine"; 20,000 applications filed in the Chhatrapati Sambhajinagar municipal corporation only by rumour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.