भाजपला दिशा दाखविणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:29 AM2020-01-11T11:29:14+5:302020-01-11T11:32:35+5:30
मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या कानपिचक्या
औरंगाबाद : हिंदुत्वाची दिशा आपण त्यांना (भाजपचे नाव न घेता) दाखविली. मात्र, त्यांनी आपलाच घात केला. आता त्यांना त्यांची दिशा दाखविण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिला. ठाकरे यांच्या दोनदिवसीय मराठवाडा दौऱ्याचा समारोप शुक्रवारी एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने झाला.
राज्यात सत्तेत आलो म्हणून बढत्या आणि बदल्यांचे कंत्राट घेऊन माझ्याकडे येऊ नका, असा इशाराही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी आणि पक्षासाठी करा, असेही ठाकरे म्हणाले. बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, रो.ह.यो.मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.
याबैठकीत ठाकरे म्हणाले की, ते बुद्धिबळाची भाषा करीत असतील तर मी पण फुटबॉल खेळणार नाही. ज्यांना मित्र मानले त्यांनी घात केल्याने दिशा बदलावी लागली. आघाडीसोबत जावे की न जावे हा मोठा प्रश्न होता. एका बाजूला विषारी साखर तर दुसरीकडे फक्त विष असेल तर निर्णय काय घ्यावा? महादेवानेही हलाल पचविलेच होते, आपणही मर्द आहोत, ते पचवू या. या सगळ्या घडामोडींचा अर्थ हिंदुत्व सोडले असा होत नाही. हिंदुत्व आणि हातातला भगवा सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
खुर्चीवरून चिमटा
राज्यमंत्री अब्दुल सत्तार बैठकीला थोडे उशिरा आले. ते आले तेव्हा ठाकरे यांचे भाषण सुरू होते. कार्यकर्त्यांनी सत्तारांसाठी खुर्ची मिळावी यासाठी धावपळ केली. त्या धावपळीकडे ठाकरे यांचे लक्ष जाताच त्यांनी खैरे यांच्याकडे पाहत ते म्हणाले, जी रिकामी असेल ती खुर्ची घ्या आणि बसा. खुर्चीसाठी उगीच वाद घालू नका. खुर्चीवर वाद घालण्याची प्रथा शिवसेनेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या कोटीने बैठकीत एकच हशा पिकला. मात्र, सत्तार आणि खैरे यांना खुर्चीवरून त्यांनी चिमटा काढल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांत होती.