आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:32+5:302021-07-26T04:05:32+5:30
ऑनलाइन अर्जप्रक्रियेला सुरुवात, प्रवेशप्रक्रिया जलदगतीने होण्याची मागणी योगेश पायघन औरंगाबाद : दहावीच्या निकालापूर्वी सुरू झालेल्या प्रक्रियेत आता विकल्पही भरता ...
ऑनलाइन अर्जप्रक्रियेला सुरुवात, प्रवेशप्रक्रिया जलदगतीने होण्याची मागणी
योगेश पायघन
औरंगाबाद : दहावीच्या निकालापूर्वी सुरू झालेल्या प्रक्रियेत आता विकल्पही भरता येत आहेत. प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी दहावीचा वाढलेला निकाल, विशेष प्रावीण्य श्रेणीत सर्वाधिक विद्यार्थी असल्याने आयटीआय प्रवेशासाठी शासकीय व खाजगी संस्थेत एकेका जागेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७ संस्थांतील २६८२ आयटीआयच्या जागांत प्रवेश मिळेल का रे भाऊ, अशी विचारणा विद्यार्थ्यांतून होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत राज्यात शासकीय आणि खासगी अशा ९६६ आयटीआयमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा असून आठवडाभरात ४१ हजार ३१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. या नोंदणीपैकी ३० हजार ६३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. जिल्ह्यातील स्थानिक ९० टक्के विद्यार्थ्यांना, तर इतर जिल्ह्यांतील १० विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असणार आहे. २७ हजार ६८० विद्यार्थ्यांनी शुल्कही भरले तर ६३०० विद्यार्थ्यांनी विकल्प आतापर्यंत भरले आहे. आयटीआय संस्थांमध्ये एकूण ९१ कोर्स उपलब्ध आहेत. त्यातील ८० कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण आणि ११ कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ही पात्रता आवश्यक आहे. विविध कोर्सेसच्या प्रवेशाच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, तसेच ‘महा आयटीआय’ या ॲपची विद्यार्थ्यांनी मदत घ्यावी, असे आवाहन शासकीय आयटीआय संस्थेचे प्राचार्य अभिजित अलटे यांनी केले आहे.
--
जिल्ह्यातील संस्था
शासकीय -११
खाजगी -६
--
जिल्ह्यातील जागा
शासकीय -२२२४
खाजगी -४३६
---
राज्यातील स्थिती
एकूण जागा - १ लाख ३६ हजार
आलेले अर्ज -४१ हजार ३१
---
गतवर्षी शासकीय आयटीआयच्या जागाही राहिल्या रिक्त
-गेल्या वर्षी शासकीय आयटीआयमध्ये १ हजार २५२ जागांसाठी तब्बल ७० हजार ४६ अर्ज आले होते.
-पहिल्या फेरीत १८०, दुसऱ्या फेरीत १२९, तिसऱ्या फेरीत ८५, तर चौथ्या फेरीत ५८ विद्यार्थ्यांनी, तर समुपदेशन फेरीत ५७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले.
- तरी ८५ जागा रिक्त राहिल्या होत्या. यापेक्षा खाजगी आयटीआयमध्ये रिक्त जागांची संख्या अधिक होती.
----
स्टेनोला पसंती
१. गेल्या तीन वर्षांपासून स्टेनो इंग्रजी, स्टेनो मराठी ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
२. इलेक्ट्रिशियन, ड्राॅफ्ट्समन, मेकॅनिकलकडे विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगाराच्या दृष्टीने ओढा असतो.
३. मशिनिस्ट, इलेक्ट्राॅनिक्स, फिटर या ट्रेडला औद्योगिक क्षेत्रातून जास्त मागणी असते.
४. खाजगीपेक्षा शासकीय आयटीआय संस्थांना विद्यार्थी प्राधान्य देतात. तर, नोकरी व्यवसाय करताना खाजगीतून आयटीआयतून प्रमाणपत्र मिळवून घेण्याचाही ट्रेंड आहे.
---
विद्यार्थी म्हणतात...
इलेक्ट्रिशियन किंवा फिटर ट्रेड गावातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मिळावा, यासाठी प्रयत्न आहे. गुण चांगले आहे. परंतु, प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असल्याने प्रक्रिया कधी संपणार, याकडे लक्ष लागले आहे.
-विष्णू ढगे, विद्यार्थी
---
मराठी स्टेनाेसाठी विकल्प भरला आहे. मात्र, कोणता ट्रेड आणि संस्था मिळेल अद्याप कळाले नाही. मेरीटनुसार नंबर लागणार आहे. त्यामुळे आवडीचा कोर्स करता येईल की नाही, याबद्दल शंका आहे.
-दुर्गा राठोड, विद्यार्थिनी