कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना १३ कोटी मनपा देणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:05 AM2021-07-31T04:05:06+5:302021-07-31T04:05:06+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल ७५० कर्मचारी कंत्राटी स्वरूपात घेतले आहेत. त्यांच्या वेतनावर दरमहा २ ...
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल ७५० कर्मचारी कंत्राटी स्वरूपात घेतले आहेत. त्यांच्या वेतनावर दरमहा २ कोटी ५९ लाख रुपयांचा खर्च होतो; मात्र मागील पाच महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगारापोटी एक रुपयाही दिलेला नाही. त्यांच्या पगारासाठी महापालिकेला १३ कोटी रुपयांची गरज आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्याने महापालिकेच्या तिजोरीतून पगार करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येईल म्हणून मागील चार महिन्यांपासून ७० टक्के कर्मचाऱ्यांना निव्वळ बसून ठेवण्यात आले आहे. एका एमबीबीएस डॉक्टरचा पगार १ लाख रुपये, तर एका तज्ज्ञ डॉक्टरचा पगार १ लाख २५ हजार रुपये एवढा आहे. महापालिकेत असे ३३ एमबीबीएस डॉक्टर व ३ तज्ज्ञ डॉक्टर आहेत. आयुष डॉक्टर तर २९४ आहेत. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये पगार निश्चित करण्यात आला आहे. पॅरामेडिकल स्टाफ, मॅनेजर अशी कितीतरी पदे भरण्यात आली आहेत. दरमहा या कर्मचाऱ्यांचा पगार २ कोटी ५९ लाख रुपयांपर्यंत जातो. पाच महिन्यांचा थकीत पगार द्यावा म्हणून दररोज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लोंढे महापालिकेत दाखल होत आहेत. पाच महिन्यांच्या पगारापोटी १२ कोटी ९६ लाख ६५ हजार रुपये लागणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणावा कोठून, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. महापालिकेच्या तिजोरीची अवस्था फारशी चांगली नाही. कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाकडून मिळणारा निधीही बंद झाला आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून किमान एक ते दोन महिन्यांचा पगार करता येवू शकतो का? यादृष्टीने प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. दोन महिन्यांचा पगार द्यायचा म्हटले तरी ५ कोटींहून अधिक रक्कम लागणार आहे. शासनाकडून कोरोना निधी प्राप्त झाल्यावर महापालिककडे वळविण्याचा विचार सुरू आहे; मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय प्रशासक घेतील, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तपशील
प्रर्वग- संख्या- पगार
सुपर स्पेशलीस्ट- ०३- ३,७५,०००
एमबीबीएस- ३३- ३३,०००००
आयुष- २९४- १,४७,०००००
अधिपारिचारिका- १३८- २७,८०,०००
पॅरामेडिकल स्टाफ- १८४- ३१,२८,०००
हॉस्पिटल मॅनेजर-०२- ७०,०००
स्टोअर किपर-०२- ४०,०००
कौन्सिलर-०१- २०,०००
डिईओ- ०१- २०,०००
वॉर्ड बाॅय-१२१- १४,५२,०००
एकूण - २,५९,३३,०००