'... तुमच्याकडे पाहून घेऊ'; अध्यक्ष निवडीवरून साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांना धमकीचे फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:38 PM2019-09-25T13:38:43+5:302019-09-25T13:39:16+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना धमकीचे फोन
औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. मात्र या निवडीवर काही जणांनी आक्षेप घेतला असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना धमकी देणारे फोन येत आहेत.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठवाड्यातील विविध साहित्यिकांची नावे चर्चेत होती; पण या सर्व चर्चेला पूर्णविराम देत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीचे साहित्य वर्तुळात स्वागत झाले असून, ही गोष्ट स्तुत्य आणि अभिनंदनीय असल्याचे मनोगत साहित्यिकांनी व्यक्त केले. मात्र ही निवड अयोग्य असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात मंगळवारपासून व्हायरल होत आहेत. यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडीवरून खालच्या स्तरावर टीका करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यावर सोशल मीडियातून अनेकांनी टीका सुरु केली आहे. टीकाकार यावरच न थांबता त्यांनी ठाले पाटील यांना फोन करून धमकी देणे सुरु केले आहे. 'तुमच्याकडे पाहून घेऊ' अशा शब्दात काहीजणांनी त्यांना धमकावले आहे. यावर ठाले पाटील म्हणाले की, मंगळवारी सर्वच स्तरातून या निवडीचे स्वागत करण्यात आले. विकास आमटे यांनी सुद्धा योग्य निवड करत फादर दिब्रिटो यांचे अभिनंदन केले. मात्र आता अचानक यावर आक्षेप घेणारी फोन सुरु आहेत. २० ते २५ फोन आक्षेप नोंदवणारी फोन केली आहेत. मुंबई, कल्याण आणि ठाणे या भागातून जास्त फोन आले आहेत. यातील काही जणांनी आवाज चढवून धमकी दिली.
'ज्या प्रमाणे एकदा निवडून आलेली आमदार-खासदार यांची निवड बदलता येत नाही त्याप्रमाणे अध्यक्ष निवड सुद्धा बदलता येणार नाही. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याच अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होईल.'- कौतिकराव ठाले पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ