आरोग्य, शिक्षण विभाग गतिमान करणार; मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:02 PM2018-05-26T12:02:28+5:302018-05-26T12:05:14+5:30
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, शिक्षण तसेच समाजकल्याण विभाग अधिक गतिमान करणे आणि यापुढे कोणत्याही योजनेचा निधी अखर्चित राहणार नाही, यावर आपला भर राहील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केला.
- विजय सरवदे
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, शिक्षण तसेच समाजकल्याण विभाग अधिक गतिमान करणे आणि यापुढे कोणत्याही योजनेचा निधी अखर्चित राहणार नाही, यावर आपला भर राहील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’च्या कॉफीटेबल उपक्रमात त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. तेव्हा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संपादक सुधीर महाजन व सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी पवनीत कौर यांनीही नि:संकोचपणे विविध प्रश्नांची कधी मराठीत, तर कधी इंग्रजीमध्ये मनमोकळ्यापणाने उत्तरे दिली.
आयएएस झाल्यानंतर पर्यविक्षाधीन कालाधीत त्यांना पालघर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. त्यांनी डहाणू येथे आदिवासी विकास विभागातही काम केले. त्यानंंतर गेल्या महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर त्यांची थेट नियुक्ती झाली. त्यांनी येथे आल्यापासून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. तेव्हा अनेक विभागांची बरीच कामे प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोक येऊन भेटतात. कामे होत नाहीत, अशी गा-हाणी मांडतात. लोकांचा विश्वास जपला पाहिजे म्हणून आठवड्यातील दोन दिवस आपण नागरिकांच्या भेटीसाठी देत आहोत. हे दोन दिवसही कमी पडत आहेत. नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी यामध्ये आणखी वाढ करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी सहकारी अधिकाऱ्यांकडे अधिकारासह कामाचे वाटप केले आहे.
प्रामुख्याने मागासवर्गीयांच्या उत्थानाच्या विविध योजना राबविणाऱ्या समाजकल्याण विभागाचा गेल्या दोन वर्षापासून निधीच खर्च झालेला नव्हता. अपंगांसाठी घरकुल योजनेचाही जवळपास सव्वा कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला नाही. आता या योजनेचे नियोजन केले आहे. साधारणपणे आठवडाभरात गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत या योजनांचा निधी सुपूर्द केला जाईल.
रोजच्या रोज फायलींचा निपटारा झाला पाहिजे, असा आपला दंडक आहे. जवळपास ७० ते ८० फायली रोज आपल्याकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे काम तसे खूप मोठे आहे. या विभागाची माहिती घेणे सुरू आहे. नुकत्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे काम पूर्ण झाले आहे. आंतरजिल्हा बदलीने ३५४ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. आता जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश येतील. शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन झाल्यामुळे पहिल्यासारखा तेवढा ताण राहिलेला नाही. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत आहे.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच येथील नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे, असेही त्या म्हणाल्या. समाजामध्ये बदल घडवायचा असेल, तर प्रशासकीय सेवेत दाखल झाले पाहिजे, हा त्यांनी बोलून दाखविलेला आत्मविश्वास बरेच काही सांगून जातो. ‘सिस्टीम में रहके सिस्टीम मे बदलाव लाना है’, या उद्देशाने त्यांचा कल भारतीय प्रशासकीय सेवेकडे झुकला. यावेळी सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, डॉ. खुशालचंद बाहेती आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केडरला दिले प्रथम प्राधान्य
पवनीत कौर या तशा पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्याच्या मूळ रहिवासी. वडील नोकरीत असल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण सुरत, बडोदा, कोटा येथे झाले. त्यांनी पुण्यात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तेथेच सहा महिने नोकरीही केली. पण, नोकरीत त्यांचे मन रमेना. घरच्यांना न सांगताच त्यांनी पुण्यातील नोकरीचा राजीनामा दिला व राजस्थान येथे जाऊन एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम केले. सामाजिक पिंड असलेल्या पवनीत कौर यांना तेथेही स्वस्थ बसवले नाही. महिनाभरातच त्यांनी तेथून दिल्ली गाठली. दिल्ली आणि पुणे येथे त्यांनी आयएएसची तयारी केली. २०१४ मध्ये त्या आयएएस झाल्या. भारतीय प्रशासन सेवेसाठी त्यांनी प्रथम पसंती महाराष्ट्र केडरला, तर द्वितीय पसंती पंजाब केडरला दिली होती. महाराष्ट्रामध्ये काम करण्यास खूप वाव आहे म्हणूनच आपण महाराष्ट्र केडरला प्रथम प्राधान्य दिले, असे त्या सांगतात.