यंदा नाथषष्ठी यात्रा होणार ? जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी राज्य शासनाकडे मागितले मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:58 PM2022-03-16T18:58:03+5:302022-03-16T19:00:00+5:30
Nathashthi Yatra : वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्या मार्गस्थ झालेल्या असल्याने प्रशासनाने यात्रा रद्द करू नये अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत आहे.
पैठण (औरंगाबाद ) : वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नाथषष्ठी यात्रेसाठी परवानगी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मागितली आहे. राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे ( Sandeepan Bhumare) यांनी मात्र नियमांचे पालनकरून नाथषष्ठी यात्रा होणारच असे ठामपणे लोकमतला सांगितले आहे. (Will Nathashthi Yatra be held this year? The Collector sought guidance from the State Government for permission)
वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्या मार्गस्थ झालेल्या असल्याने प्रशासनाने यात्रा रद्द करू नये अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत आहे. यंदा नाथषष्ठी यात्रा होणार असे घोषीत करून नाथषष्ठी यात्रेसाठी राज्य शासनाने दिलेले सव्वाकोटीचे अनुदान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मंजूर केलेले आहे. अनुदानातून नाथषष्ठी यात्रेच्या अनुषंगाने सोयी सुविधांच्या कामास सध्या पैठण शहरात गती आली आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानात माल भरलेला आहे. राज्यभरातील वारकरी दिंड्यांच्या प्रमुखांनी शहरात मुक्कामाच्या जागा ठरवल्या आहेत. सर्वत्र नाथषष्ठीची तयारी सुरू आहे.
दरम्यान, नाथषष्ठी तयारीच्या दृष्टीने बुधवारी पैठण येथे आयोजित केलेली प्रशासकीय बैठक रद्द झाली. तसेच गोदावरी पात्रात सुरू असलेले नाथषष्ठीचे कामे स्थगीत करण्यात आल्याने नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याची वार्ता शहरभर पसरली. यामुळे वारकरी संप्रदायातून एकच संतापाची लाट उसळली. शहरातील व्यापारी हवालदील झाले. मात्र यात्रा रद्द झाल्याची अधिकृत बातमी आलेली नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाकडे परवानगी मागीतली. अप्पर जिल्हाधिकारी - अनंत गव्हाणे. यात्रा रद्द झाल्याचे वृत्त अनधिकृत असून नाथषष्ठी यात्रे संदर्भात राज्य शासनाकडे प्रशासनाने परवानगी मागितली आहे. या बाबत शासनस्तरावर निर्णय होणार आहे. असे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले.
यावर्षी नाथषष्ठी यात्रा होणारच
पंढरपूर नंतर नाथषष्ठी वारकरी संप्रदायाची महत्वाची यात्रा आहे. वारकऱ्यांच्या दिंड्या पैठण शहराकडे आगेकूच करीत आहेत. यामुळे नियमाचे पालन करून नाथषष्ठी यात्रेस परवानगी मिळावी म्हणून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. नाथषष्ठी यात्रेसंदर्भात तयारीचे कामे बंद करू नका असे आदेश आपण पैठण नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले असल्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.