नव्या योजनेतून साताऱ्याची तहान प्रथम भागेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:05 AM2021-07-28T04:05:07+5:302021-07-28T04:05:07+5:30
औरंगाबाद : सातारा देवळाई परिसरातील नागरिकांना विहिरी, टँकर, बोअरवेल आणि जारच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. शासनाच्या मंजूर झालेल्या पाणी योजनेतून ...
औरंगाबाद : सातारा देवळाई परिसरातील नागरिकांना विहिरी, टँकर, बोअरवेल आणि जारच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. शासनाच्या मंजूर झालेल्या पाणी योजनेतून सातारा देवळाईकरांना प्रथम पाणी मिळावे, अशी अपेक्षा महानगरपालिकेला सर्वात जास्त कर देणारा वाॅर्ड म्हणून व्यक्त होत आहे.
परिसरात जलवाहिनी टाकणे, मोठ्या जलकुंभ उभारणीचे काम जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु याला किती कालावधी लागेल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.
ग्रामपंचायतीच्या काळात विहिरीवरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. वसाहती वाढत गेल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेलही मारण्यात आले. आता मनपाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते. टँकर कधी येईल, याचा नेम नाही. महानगरपालिकेत विलीन झाल्यावर पाणी प्रश्न पहिल्या टप्प्यात सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. ती अद्याप पूर्णत्त्वाला गेली नाही.
पाण्याविन सातारा देवळाईत घशाला कोरड...
महानगरपालिकेत येऊनही सातारा देवळाई परिसराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा होत नसल्याने मालमत्ताधारकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. चार पाहुणे घरी आले की, खिशाला अधिकचा ताण पडतो. टोलेजंग इमारती असल्या तरी आत कोरड्याठाक आहेत. त्यामुळे या योजनेतून प्रशासनाने पहिला पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशीच अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.