भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा
By स. सो. खंडाळकर | Published: July 31, 2023 08:03 PM2023-07-31T20:03:09+5:302023-07-31T20:06:58+5:30
दि. १ ऑगस्ट रोजी सिडकोतील अग्रसेन भवनात भिडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही, असा स्पष्ट इशारा स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांना तसे निवेदनच सोमवारी दुपारी सादर करण्यात आले.
मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी सिडकोतील अग्रसेन भवनात भिडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अलीकडेच भिडे यांनी महात्मा फुले, पेरियार रामस्वामी नायकर, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू व साईबाबा यांच्याविषयी तसेच स्वातंत्र्य दिन, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाविषयीही अनुद्गार काढले होते.
भिडे यांच्या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात निदर्शनेही करण्यात आली. संभाजी भिडे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. भिडे यांना अटक न होता ते राज्यात मोकाट फिरत आहेत. त्यांचा बोलविता धनी कोणी तरी वेगळाच असून, त्यांना राज्यात, देशात जातीय सलोखा, सामाजिक सलोखा संपवून जाती-धर्मात दंगली घडवून आणायच्या आहेत, असा स्पष्ट आरोप पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना महाविकास आघाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासबापू औताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, अभिषेक देशमुख, भीमशक्तीचे दिनकर ओंकार, डॉ. अरुण शिरसाठ, किरण पाटील डोणगावकर, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, संतोष भिंगारे, संदीप बोरसे आदींची उपस्थिती होती.