पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:04 AM2021-05-26T04:04:41+5:302021-05-26T04:04:41+5:30
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मे रोजी पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश दिले ...
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मे रोजी पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. केंद्र सरकार व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का, असा खोचक सवाल आ. सतीश चव्हाण यांनी समाजमाध्यमातून उपस्थित केला आहे.
पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटरसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दखल घ्यावी लागली. परंतु पंतप्रधानांच्या आदेशाला जर ‘केराची टोपली’ दाखविली जात असेल तर सर्वसामान्य लोकांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडून कुठल्या न्यायाची अपेक्षा ठेवायची, असा सवाल आ. चव्हाण यांनी विचारला आहे.
आ. चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मिळालेल्या व्हेंटिलेटरची माहिती घेतली. तेव्हा या रुग्णालयास पीएम केअर फंडातून ज्योती सीएनसी कंपनीची २५ व्हेंटिलेटर प्राप्त झाली. मात्र, त्या व्हेंटिलेटरमधून रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने ते व्हेंटिलेटर मिळाल्यापासून तसेच बंद अवस्थेत पडून असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी दिली आहे.