आत्महत्याग्रस्त गावांना पोकरात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:05 AM2021-06-06T04:05:01+5:302021-06-06T04:05:01+5:30
सोयगाव : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गावात त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाला उभारी देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत त्या गावांचा ...
सोयगाव : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गावात त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाला उभारी देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत त्या गावांचा समावेश होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनस्तरावर प्रस्तावर सादर करणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे व खरीप पेरणीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बचत भुवन सभागृहात बैठक पार पडली. यावेळी पांडे यांनी तालुकास्तरातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी माधुरी तिखे यांनी खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या, जेणेकरून कोणताही शेतकरी आर्थिक विंवचनेतून आत्महत्येचे पाऊल उचलणार नाही. असे सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, तालुका कृषी अधिकारी संगीता पवार, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे, विठ्ठल जाधव यांची उपस्थिती होती.
--
३४ गावांतील कुटुंबांना देणार भेटी
सोयगाव तालुक्यातील ३४ गावांतील ६९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांना भेटी देऊन त्यांची माहिती संकलित करण्यासाठी दत्तक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. वारसांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा, शुभ मंगल योजना, जनधन, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला महिला बचतगटात समाविष्ट करून त्यामध्ये विविध लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी मांडला.
---
फोटो