'पैशांचा पाऊस पाडतो'; हैद्राबादच्या दोघांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला बीडमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 03:42 PM2019-07-04T15:42:22+5:302019-07-04T15:43:16+5:30
पैसे मिळताच बाबाने रचलेल्या योजनेनुसार हैदराबादच्या दोघांची फसवणूक केली होती.
औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडतो ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या दोघांना साडेआठ लाखांना गंडा घालून पसार झालेल्या नारेगावातील भोंदूबाबा साहेबखा पठाण यास सिडको पोलिसांनी बीडमध्ये बुधवारी अटक केली आहे.
मे महिन्यात सिडकोत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी भोंदूबाबाची गाडीही जप्त केली होती़ मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होणाऱ्या साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तार बाबाला अखेर बीड येथून सिडको पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या टीमला फरार आरोपीची खबर मिळाली होती. अधिक माहिती अशी की, डोडू सत्यनारायण (रा. न्यू एलबी नगर, मेन रोड, हैदराबाद) आणि सय्यद जहाँगीर सय्यद अब्दुल खादब (रा. मौलाअली, हैदराबाद) यांची हजारी सुरेश खत्री (रा. धुलपेठ, हैदराबाद) यांच्याशी मैत्री आहे. खत्रीने तीन वर्षांपूर्वी नारेगावच्या सत्तार बाबाशी फोनवरून बोलणे करून दिले होते. तसेच, बाबा खूप करामती आहे. सर्व गरिबी, अडचणी दूर करून देतील. पण, औषधाला २५ लाख रुपये लागतील, असे सांगितले होते.
१७ फेब्रुवारीला सत्तार बाबाने डोडू आणि सय्यद जहाँगीर यांना भेटण्यासाठी बोलावले. २५ लाख नाही तर किती पैसे देऊ शकता, असे त्यांच्यात बोलणे झाले. त्यानुसार तात्काळ म्हणून २ लाख देण्याचे ठरले. त्यानंतर रमजान महिना लागल्यानंतर मी काम करू शकत नाही. त्यामुळे लवकर पैसे घेऊन या, असे सत्तार बाबाने सांगितल्यामुळे हैदराबादच्या दोघांनीही सोने गहाण टाकून ६.५० लाख रुपये जमविले. ४ मे रोजी ते देण्यासाठी दोघेही औरंगाबादला आले. त्यांची लॉजवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुपारी ४ वाजता सत्तार बाबा स्वत:च्या कारने लॉजवर आला. त्याने ६़५०लाख रुपये आणि दोन चेक घेतल्यानंतर हैदराबादला जाण्याचे ठरविले. ते बीडमार्गे हैदराबादला जात असताना लातूर रोडला लागल्यावर अनोळखी इसमाकडून विधीच्या साहित्यासाठी पैसे दिले. पैसे मिळताच बाबाने रचलेल्या योजनेनुसार हैदराबादच्या दोघांची फसवणूक केली होती.