बंडखोरीची पुनरावृत्ती डोकेदुखी ठरेल ?
By Admin | Published: June 14, 2014 01:18 AM2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:20:47+5:30
वहाबोद्दीन शेख, नायगाव बाजार गत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार
वहाबोद्दीन शेख, नायगाव बाजार
गत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीची पुनरावृत्ती टळणार की होणार, याकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर विजयश्री मिळविली होती. माजी आमदार श्रीनिवास (बापूसाहेब) गोरठेकर यांचा त्यांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. परंतु आता पाच वर्षांच्या कार्यकाळात बरेच पाणी वाहून गेले आहे. आगामी निवडणुकीत मतदारसंघात होणारी बंडखोरी कशी रोखावी, असा कळीचा प्रश्न आ. चव्हाण यांच्यासमोर उभा राहणार आहे. हा प्रश्न किती दिवस चर्चेत राहील आणि त्याचा शेवट काय असेल, हे आगामी काळच सांगेल.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण गरम होऊ लागल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभ आदी सार्वजनिक कार्यक्रमात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याकामी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी उमरी, धर्माबाद आणि नायगाव या तीन तालुक्यांचा मतदारसंघ नव्याने निर्माण झाला. पहिले आमदार म्हणून चव्हाण यांना १२ उमेदवारांशी लढत द्यावी लागली होती. २०१४ च्या निवडणुकीत काय-काय घडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी आमदार कै. बळवंतराव चव्हाण यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध. बळवंतरावांनी पवारांचा कोणताही शब्द खाली पडू दिला नाही. त्यानंतर त्यांचे चिरंजीव वसंतराव चव्हाण यांनीदेखील वडिलांची परंपरा सुरु ठेवली. मात्र २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल या आशेने मतदारसंघ पिंजून काढला. परंतु पक्षाने चव्हाण यांच्याऐवजी गोरठेकरांना रिंगणात उतरविले. इथेच बंडखोरीची ठिणगी पडली. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या वतीने नायगावात शरद पवार, तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. मात्र अपक्ष चव्हाण यांनी ही निवडणूक ११ हजार १२० मतांनी जिंकली.
काँग्रेसकडून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने मिळाली. तेव्हापासून आ. चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे ते प्रमुख दावेदार आहेत. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी वसंतराव-गोरठेकर-कुंटूरकर एका मंचावर आले होते. हे मनोमिलन विधानसभेपर्यंत टिकेल का? सध्याच राष्ट्रवादीकडून श्रीनिवास गोरठेकर, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश कुंटूरकर यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गत निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण ठक्करवाड चौथ्या क्रमाकांवर होते. बालाजी बच्चेवार यांनी जनसुराज्यकडून निवडणूक लढविली होती. ते पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. भाजपकडून श्रावण पाटील भिलवंडे, राम पाटील रातोळीकर, शंकर कल्याण, बालाजी बच्चेवार आदी इच्छुक आहेत.
अपक्षवसंतराव चव्हाण ६३,५३४
राष्ट्रवादी श्रीनिवास गोरठेकर ५२,४१४
जनसुराज्यबालाजी बच्चेवार १६,६८८
इच्छुकांचे नाव पक्ष
वसंतराव चव्हाण काँग्रेस
श्रीनिवास गोरठेकर राष्ट्रवादी
राजेश कुंटूरकर राष्ट्रवादी
बालाजी बच्चेवार भाजपा
लोकसभा निवडणुकीत डी.बी. पाटील (भाजपा) यांना ३ हजार ८४६ एवढे मताधिक्य