वाळूज बाजारतळावरील अतिक्रमण हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:15 PM2019-05-09T19:15:13+5:302019-05-09T19:15:24+5:30
वाळूजच्या आठवडी बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
वाळूज महानगर : वाळूजच्या आठवडी बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सदरील अतिक्रमणे हटविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पोलीस, महसूल आदी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पाठविला आहे.
वाळूज येथील गट क्रमांक ३४० व ३४१ या शासकीय गायरान जमिनीवर तीन ते चार दशकांपासून आठवडी बाजार भरत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी या आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात येतो. यातून ग्रामपंचायतीला दरवर्षी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपन नसल्याने बाजाराच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमणे केली आहे.
गावातील जवळपास १६५ नागरिकांनी कच्चे तसेच पक्के बांधकामे केली आहेत. यामुळे आठवडी बाजारात पाले-भाज्या व अन्न-धान्य विक्रीसाठी येणाºया शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी गतवर्षी १४ मार्च रोजी ग्रामपंचायतीला दिले. मात्र अद्याप अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.
सदरील अतिक्रमणे हटविण्याबाबत नियोजनासाठी तहसीलदारांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस निरीक्षक यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने २९ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे पाठविला आहे. तहसीलदारांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर अतिक्रमण हटविण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सरपंच पपीनकुमार माने, ग्रामविकास अधिकारी एस.एसी.लव्हाळे यांनी सांगितले.