महिला आरक्षणाने अत्याचार थांबतील का? युवक महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनीचा सवाल
By राम शिनगारे | Published: October 5, 2023 07:17 PM2023-10-05T19:17:30+5:302023-10-05T19:17:30+5:30
आरक्षणामुळे महिलांचा संसदेत टक्का वाढेल
छत्रपती संभाजीनगर : महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मणिपूर, हैदराबाद, दिल्लीसह इतर ठिकाणी सतत महिलांवर होणारे अत्याचार थांबतील का, असा सवाल वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनीने उपस्थित केला. तर काहींनी महिलांना मंदिरात पुजारी, चर्चमध्ये फादर, मशिदीत मौलाना बनता येणार नाही, पण आरक्षणामुळे संसदेत पंतप्रधान बनता येईल, असेही सांगितले.
विद्यापीठातील युवा महोत्सवात शब्दरंग स्टेजवर दुपारनंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महिला आरक्षण, हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि चंद्रावर पोहोचलो, आता पुढे काय? हे तीन विषय देण्यात आले होते. त्यात सर्वाधिक मत महिला आरक्षणांवरच विद्यार्थिनीनी मांडले. एका विद्यार्थिनीने बोलताना महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवले आहे. प्रत्येक ठिकाणी महिला सक्षमपणे काम करीत आहेत. देशाची राष्ट्रपती महिला आहे. पंतप्रधान महिला बनल्या आहेत. या आरक्षणामुळे महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल, असे सांगितले. एका विद्यार्थिनीने सांगितले की, महाराष्ट्रात एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्क्यांची सूट दिली. म्हणून महिला फिरू लागल्या आहेत. यामुळे त्यांना व्यवहारासह इतर गोष्टीही समजू लागल्या आहेत. लोकसभा, विधानसभेतील आरक्षणामुळे महिलांचा विकासच होणार असल्याचे सांगितले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वातंत्र्यानंतरच महिलांना समान हक्क देण्यासाठी हिंदू कोड बिल आणले. ते मंजूर न झाल्यामुळे त्यांनी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा उल्लेखही एका विद्यार्थ्याने केला.
पाश्चात्य गायनाचे सूर निनादले
उद्घाटनानंतर सृजनरंग मंचावर पाश्चात्य समूह गायन, सुगम गायनाचे सूर उमटले. या प्रकारात अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवित पाश्चात्य गाण्यांचे वाद्यांवर सादरीकरण केले. ललितरंग रंगमंचावर दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रालाच प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर व्यंगचित्रकला व कोलाज या स्पर्धाही याच मंचावर घेण्यात आल्या. नादरंग रंगमंचावर शास्त्रीय तालवाद्यांचे सादरीकरण विविध संघांनी केल्याचे पाहायला मिळाले.