पुरस्कारांची परंपरा कायम ठेवणार
By Admin | Published: June 19, 2014 12:39 AM2014-06-19T00:39:11+5:302014-06-19T00:52:08+5:30
औरंगाबाद : महापालिकेने दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अर्थरूपी पुरस्कारांची परंपरा कायम सुरू राहणार असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केला.
औरंगाबाद : महापालिकेने या वर्षीपासून दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अर्थरूपी पुरस्कारांची परंपरा यापुढे कायम सुरू राहणार असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केला. १३७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवीत उत्तीर्ण झाले आहेत.
आयुक्तांच्या दालनात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहनेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते मीर हिदायत अली, सभापती सावित्री वाणी, नगरसेवक नारायण कुचे, उपायुक्त सुरेश पेडगावकर, शिक्षणाधिकारी ए.एम. शेख, मुख्याध्यापक संजीव सोनार, शिक्षक आदींची उपस्थिती होती. आयुक्त म्हणाले की, मिलिंद दाभाडे हा मनपा शाळांतून पहिला आहे. त्याला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. उर्वरित ८० ते ८४ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना ५० हजार, ७५ ते ८० टक्के मिळवणाऱ्यांना ३५ हजार, ७० ते ७५ टक्के मिळवणाऱ्यांना २० हजार आणि ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना या पारितोषिकांचे वितरण होईल. पुढच्या वर्षीचा निकाल ९० टक्क्यांहून पुढे जाईल, असा दावा आयुक्तांनी केला. शिक्षक, सराव वर्ग, परीक्षा, अपेक्षितांचा पुरवठा, संगणक कक्षाची सोय, व्हॅकेशनमुळे विद्यार्थ्यांना यश मिळविता आले.
शाळाखोल्या वाढविणार
मुख्याध्यापकांनी वर्ग कमी पडत असल्याचे आयुक्तांना सांगितले. यावर आयुक्त म्हणाले की, शाळाखोल्या वाढविण्यात येतील. तात्पुरत्या व्यवस्थेसाठी जागा भाडेत्तत्वावर घेण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले.
तासिका शिक्षकांची वेतनवाढ
तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले. रात्रीचे वर्ग, सराव परीक्षा, विद्यार्थ्यांशी आयुक्तांनी केलेला संवाद यामुळे मनपा शाळांचा निकाल या वर्षी उंचावला. तासिका शिक्षकांना शिक्षणसेवकाइतके तरी किमान वेतन मिळेल. याची व्यवस्था या वर्षी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.