संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी
By बापू सोळुंके | Published: April 9, 2024 02:14 PM2024-04-09T14:14:30+5:302024-04-09T14:18:01+5:30
उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर : महायुतीमध्ये मोजक्याच जागांवरून रस्सीखेच सुरू आहे, यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिंदेसेना आणि भाजपकडून दावा करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी पक्की झाल्याची चर्चा सुरू आहे. सोमवारी आ. संजय शिरसाट यांच्या कोकणवाडी चौकातील संपर्क कार्यालयातील विमानाच्या आकाराच्या केबिनमध्ये निवडणूक तयारीची बैठक घेऊन भुमरे यांच्या दिल्लीवारीची तयारी करण्यात आली.
उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा पालकमंत्री भुमरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी बोलावलेली बैठक आणि त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास यावरून तेच लोकसभेचे उमेदवार असतील, असे दिसून येत आहे. शिवसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार आणि भरत राजपूत यांची उपस्थिती होती. पालकमंत्री भुमरे म्हणाले की, औरंगाबाद लोकसभेची सीट शिवसेनेचीच आहे. उमेदवार कोण द्यायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. येथील जागा वाटप अद्याप झाले नाही. तरी महायुतीचा उमेदवार कुणीही असो; तो आम्ही निवडून आणणारच आहोत. निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आजची बैठक असल्याचे ते म्हणाले. अदालत रोडवरील जुन्या अशोका हॉटेलच्या जागेवर पक्षाचे प्रचार कार्यालय उघडले जाणार आहे. दोन दिवसांत उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुमची उमेदवारी जाहीर होणार का, असे विचारले असता भुमरे म्हणाले की, शिंदे हेच उमेदवारी घोषित करतील; पण तिकीट कुणाला मिळणार, हे अद्याप आम्ही कोणीही सांगू शकत नाही.
ऐनवेळी बदलले बैठकीचे स्थळ
भुमरे यांच्या गारखेडा सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व आमदार आणि जिल्हाप्रमुखांना तेथेच बोलावण्यात आले होते. मात्र, भुमरे यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे पाहून भुमरे यांनी बैठक आ. शिरसाट यांच्या कार्यालयात घेऊ असे सांगून ते स्वत: कोकणवाडी चौकातील शिरसाट यांच्या कार्यालयात दाखल झाले. तेथेच विमानाच्या आकाराच्या केबिनमध्ये ही बैठक पार पडली.