सतीश चव्हाण गंगापुरातून तुतारी हाती धरणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तेवढाच विरोधही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:21 AM2024-10-22T11:21:22+5:302024-10-22T11:22:10+5:30
सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेतल्यास गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघू शकतात.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी अडीच वर्षांत महायुती सरकार बहुजन समाजाला न्याय देऊ शकले नाही, असे महायुती सरकारला खडेबोल सुनावले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर ते निवडणूक लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर अजित पवार राष्ट्रवादीने सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाईही करून टाकली. चव्हाण यांचा शरद पवार गटात अद्याप प्रवेश झालेला नसला तरी तो निश्चित मानला जात आहे; पण त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादी शरद पवार गटातून कडाडून विरोधही होत आहे. प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते आम्ही राजीनामा देऊ, अशी भाषा बोलत आहेत.
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत बंब यांना आव्हान देत मागील काही वर्षांपासून आमदार सतीश चव्हाण विधानसभेची तयारी करत आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, मुस्लीम अशा सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निवडणुका जाहीर होईपर्यंत रखडत ठेवल्याने चव्हाण नाराज झाले. त्यांनी प्रसिद्धिपत्रक काढत सरकारवर टीका केल्याने राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात आले.
मराठवाडा सर्वच समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाने धगधगत आहे. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात देखील हा मुद्दा कळीचा बनत आहे. चव्हाण यांनी तुतारी हाती घेतल्यास गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघू शकतात. दरम्यान, भाजपने विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात चव्हाण आणि बंब यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे.