छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार 

By सुमित डोळे | Published: November 17, 2023 07:30 PM2023-11-17T19:30:53+5:302023-11-17T19:31:47+5:30

पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, लवकरच होणार निधीची घोषणा

will set up a separate rest house for policemen coming for work in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार 

छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार 

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या गुन्ह्याचा तपास, बंदोबस्त असो किंवा न्यायालयीन कामकाज, अन्य शहरातून आलेल्या पोलिसांची त्या दरम्यान राहण्याची मोठी गैरसोय होते. यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात लवकरच स्वतंत्र मोठे विश्रामगृह उभे राहणार आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येत्या आठवड्याभरात दीड ते दोन कोटींचा निधी देऊन याला मंजुरी देण्याची घोषणा केली.

उपअधीक्षक ते उपनिरीक्षक पदापर्यंत कर्तव्य बजावत असताना अनेकदा आंतरजिल्हा बदल्या होतात. मात्र त्या दरम्यान केलेल्या गुन्ह्यांचा तपास, घटनेच्या सुनावणीसाठी संबंधित न्यायालयात, आस्थापनांत हजर राहावे लागते. यात अनेकदा सेवानिवृत्त झालेले अधिकारी, हवालदारांनाही न्यायालयात उपस्थित राहावे लागते. त्याशिवाय सीआरपीएफ, एसआरपीएफचे जवान, अन्य जिल्ह्यांतले पोलिस अनेकदा बंदोबस्तासाठी शहर, जिल्ह्यात येतात. मात्र यावेळी त्यांच्या राहण्याची मोठी गैरसाेय होते. त्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोय होते. मात्र, उपनिरीक्षक ते हवालदारांची मात्र अडचण होते.ही अडचण लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी स्वतंत्र विश्रामगृहाची संकल्पना मांडली.

काय आहे संकल्पना?
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उपलब्ध जागेत एक प्रशस्त हॉल असेल. त्यामध्ये बंदोबस्तासाठी येणारे पोलिस, अन्य कामांसाठी येणाऱ्या पोलिसांसाठी खाट, स्वच्छतागृह असेल. तर अधिकाऱ्यांसाठी अत्यंत अल्प दरात १० ते १५ खोल्या असतील. शिवाय, अल्प दरात खाद्यपदार्थांच्या स्वयंपाकघराचे देखील यात नियोजन असेल. भुमरे यांनी चव्हाण, कलवानिया यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. दिवाळी होताच प्रस्ताव सादर करा, दीड ते दोन कोटी रुपये मंजूर करतो. तत्काळ काम सुरू करा, असे आश्वासन त्यांनी दिले. येत्या पंधरा दिवसांमध्ये हा प्रस्ताव सादर होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: will set up a separate rest house for policemen coming for work in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.