शिवसेना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पळविणार का?

By गजानन दिवाण | Published: May 31, 2018 09:32 PM2018-05-31T21:32:26+5:302018-05-31T21:33:19+5:30

शिवसेनेचे राजकारणाचे गणित बदलले आहे आणि मराठी माणसांनीही ते ओळखले आहे.

Will Shiv Sena run the officers of the Municipal Corporation? | शिवसेना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पळविणार का?

शिवसेना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पळविणार का?

googlenewsNext

गजानन दिवाण

मुंबई पालिकेत शिवसेनेचीच सत्ता असायला हवी, हे मत शिवसैनिकांचे असायचेच. मुंबईत आणि मुंबईबाहेर राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसाचेही हेच मत असायचे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनाही हेच वाटायचे. मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर सत्तेत शिवसेनाच असायला हवी, यावर सर्व पक्षांतील मराठीप्रेमींचे एकमत असायचे. त्यामुळेच गेल्या काही दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता राहिली आहे. आता चित्र बदलत आहे. मराठी माणूस सेनेबाबत तेवढा भावनिक होताना दिसत नाही आणि सेनाही मराठीच्या मुद्यावर तेवढी भावनिक दिसत नाही. शिवसेनेचे राजकारणाचे गणित बदलले आहे आणि मराठी माणसांनीही ते ओळखले आहे.
महाराष्ट्रात असो वा राज्याबाहेर सर्वसामान्य मराठी माणसाच्या मदतीला सर्वात आधी धावतो तो शिवसैनिक. रूग्णालय असो वा एखादे शासकीय कार्यालय. बसस्थानक असो वा रेल्वेस्थानक. मराठी माणसासाठी वाट्टेल ते करणारा असतो तोही शिवसैनिकच. कमीअधिक असेल, पण राज्यभरात सर्वांची भावना हीच होती. आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. नुसत्याच सतरंज्या उचलून, नेत्याच्या मागे फिरून आणि असे सामाजिक काम करून राजकारणाचे दिवस कधीच गेले हे शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही जाणले आहे. म्हणून सर्वसमान्यांच्या मदतीला धावणारा शिवसैनिक कमी झाला आहे. केवळ सर्वसामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर येणारी शिवसेनाही आता वेगवेगळे हित जोपासताना दिसत आहे.

औरंगाबादेत बुधवारी क्रीडा संकुलावर शिवसेनेने केलेले आंदोलन त्याचाच भाग दिसत आहे. २०१० साली हे क्रीडा संकुल सुरू झाले. तेव्हापासून कुठल्याच प्रश्नी शिवसेनेने या क्रीडा संकुलावरील धूळ झाडली नाही. प्रश्न नव्हते का, तर तसे अजिबात नाही. ‘लोकमत’ने क्रीडा संकुलातील गैरसोयींबद्दल गेल्या दोन वर्षांत अनेक मालिका लिहील्या. बातम्या दिल्या. पाण्याची समस्या, शौचालयांमधील अस्वच्छता असे अनेक प्रश्न हाताळले. त्याची दखल घेऊन क्रीडा संकुल प्रशासनानेही त्यात सुधारणा केली. त्यावेळी ही शिवसेना कुठेच दिसली नाही. यातील एकाही प्रश्नावर सेनेने आंदोलन केले नाही. औरंगाबादेत कचराकोंडीने शंभरी ओलांडली. शहरात जागोजागी उकिरडे निर्माण झाले आहेत. येथील दूर्गंधी-अस्वच्छता सेनेला अजिबात दिसली नाही. सेनेच्या कुठल्याही नेत्याने या प्रश्नावर पालिकेच्या अधिकाºयाला पळविले नाही वा कुठला जाब विचारला नाही. पूर्ण शहराचे आरोग्य कचराकोंडीमुळे बिघडले असताना क्रीडा संकुलातील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवरील धूळ शिवसेनेला महत्त्वाची का वाटली, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.

शिवसेनेने सुरूवातीपासूनच औरंगाबादवर प्रचंड प्रेम केले. औरंगाबादकरांनीही प्रत्येकवेळी सेनेला साथ देत या प्रेमाला पुरेपूर साद दिली. महापालिका असो वा खासदारकी, औरंगाबादकरांनी डोळे झाकून सेनेला साथ दिली. बदल्यात औरंगाबादकरांना काय मिळाले? जायकवाडीत भरपूर पाणी असूनही पाण्याचा प्रश्न मिटला नाही. शहरात कुटुंबासह जावे असे गार्डन नाही. एकमेव असलेल्या सिद्धार्थ गार्डनलाही पालिकेला जपता आले नाही. येथील प्राणीसंग्रहालयाची मान्यता रद्द होण्याची वेळ आली. पर्यटनाच्या राजधानीला शोभतील असे रस्ते नाहीत. पर्यटनातून अनेक गोष्टी करता येऊ शकतात, त्याचे ब्रॅडिंगदेखील करता आले नाही. शहर बससेवेचा प्रश्न सोडविता आला नाही. समस्यांची यादी सांगायची ती किती?

शहरासमोर एवढ्या मोठ्या समस्यांचा डोंगर उभा असताना शिवसेनेला क्रीडा संकुलातील धुळीचा प्रश्न मोठा वाटला. त्या धुळीची जाणीव व्हावी म्हणून सेनेने बुधवारी दम भरीत क्रीडा अधिकाºयांनाच ट्रॅकवर पळविले. शहरातील कुठल्याच प्रश्नावर हे धाडस न दाखविणारी शिवसेना चक्क क्रीडा संकुलावर का पोहोचली, याचा विचार करीत असतानाच बदलीचा हंगाम सुरू असल्याची आठवण एका सेनेच्याच कार्यकत्याने करून दिली. शिवसेनेची मराठी माणूस आणि त्याच्या समस्यांविषयीची तळमळ याचा इतिहास माहित असल्याने मला हे पटले नाही. पण, भूतकाळच तो. वर्तमानाचे काय सांगणार?
 

Web Title: Will Shiv Sena run the officers of the Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.