मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांमार्फत रेल्वेचे प्रश्न सोडवणार; मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:19 PM2018-08-25T18:19:43+5:302018-08-25T18:20:45+5:30
मराठवाड्यातील रेल्वेविषयक प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते मार्गी लागण्यासाठी आधी राज्याचे मुख्यमंत्री व नंतर रेल्वेमंत्र्यांना भेटून प्रयत्न करण्याचा निर्धार आज मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत करण्यात आला.
औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वेविषयक प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते मार्गी लागण्यासाठी आधी राज्याचे मुख्यमंत्री व नंतर रेल्वेमंत्र्यांना भेटून प्रयत्न करण्याचा निर्धार आज मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. ही बैठक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळाचे सदस्य सचिव डी.एम. मुगळीकर व जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या सभागृहात पार पडली.
मागण्या अनेक असल्या तरी प्राधान्यक्रमाने तीन-चारच मागण्यांवर भर द्यावा, असेही ठरले. प्राधान्यक्रमाच्या या मागण्या अशा- औरंगाबाद- चाळीसगाव हा ९०० कि.मी.चा रेल्वेमार्ग रद्द होता कामा नये. उलट या मार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद करून गती देण्यात यावी, रोटेगाव-कोपरगाव हा २२ कि.मी.चा मार्गही लवकरात लवकर पूर्ण करावा, औरंगाबाद ते मुंबई या मार्गावर गाड्यांची संख्या वाढावी यासाठी चिकलठाणा येथील रेल्वे बोर्डाच्या जागेवर पीटलाईन मंजूर करण्यात यावी, यातील तांत्रिक अडचणी बाजूला सारून ही पीटलाईन झालीच पाहिजे, मराठवाड्याचा समावेश दक्षिण मध्यमधून मध्य रेल्वेत करण्यात यावा, मुंबई ते मनमाड या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या रात्री मनमाडला मुक्कामी असतात, त्या गाड्यांचा मुक्काम औरंगाबादला हलविण्यात यावा, जेणेकरून औरंगाबाद ते मुंबई या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांना भेटण्याचे नियोजन करून शिष्टमंडळ नेण्यात येईल, असे डॉ. कराड यांनी जाहीर केले.
या बैठकीस औरंगाबाद दमरेचे सहायक अभियंता विजयकुमार खोबरे, प्रभाग अभियंता उदय यादव, कन्नडच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, तसेच रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा करणारे ओमप्रकाश वर्मा, अनंत बोरकर, जि.प. सदस्य एल.जी. गायकवाड, जि.प.चे माजी अध्यक्ष अण्णा शिंदे, गोपीनाथ वाघ, संजय खंबायते, डॉ. संजय गव्हाणे, मोहंमद मुश्ताक, राजेश महेता, संतोष भाटिया, दामोदर पारीख, प्रा. आर.जी. लहाने, वर्धमान जैन, चंद्रकांत मेने, नितीन अमृतकर, कल्याण जंजाळ, सुरेश राऊत, प्रल्हाद पारटकर, वैभव सातपुते, ब.द. जटाळे, संजय भर्गोदेव, अनिल भारसाखळे आदींनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी प्रवासी संघटना, वैजापूर, कन्नड तालुक्यातर्फे डॉ. अण्णा शिंदे, मराठवाडा रेल्वे विकास समितीतर्फे ओमप्रकाश वर्मा आदींनी डॉ. कराड यांच्याकडे निवेदने सादर केली.