आता शेवटची तारीख! ईदनंतर लेबर कॉलनीचा ताबा घेणार; नागरिकांना घरे सोडण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:58 PM2022-04-29T19:58:55+5:302022-04-29T19:59:45+5:30
सर्व कार्यालये प्रशासकीय संकुलात हलविण्यात येतील. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यालयांसाठी देण्यात येणारे सव्वादोन कोटी रुपये वाचतील.
औरंगाबाद: विश्वासनगर, लेबर कॉलनीतील साडेतेरा एकरहून अधिक जागेत असलेल्या सदनिका रमजान ईदनंतर ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू होईल. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत सदनिका नागरिकांनी शांततेने रिक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.
ती जागा ताब्यात घेतल्यानंतर तेथे प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे. तेथे जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रिमंडळ बैठकीसाठी सभागृह, प्रदर्शन हॉल बांधण्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर असून इमारतीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शहरात ४० हून अधिक शासकीय कार्यालये भाडेकरारावर आहेत. ती सर्व कार्यालये प्रशासकीय संकुलात हलविण्यात येतील. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यालयांसाठी देण्यात येणारे सव्वादोन कोटी रुपये वाचतील. महापालिका, सा. बां. विभाग आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करणार आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, बां. वि.चे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदींची उपस्थिती होती.
८ नोव्हेंबरपासून तारीख पे तारीख
८ नोव्हेंबर २०२१ पासून लेबर कॉलनीसाठी ‘तारीख पे तारीख’ची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालय, सर्वेाच्च न्यायालयापर्यंत लेबर कॉलनीतील सदनिकाधारकांनी लढा दिला आहे तसेच यामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आता ३० एप्रिलपूर्वी सदनिकाधारकांनी स्वत:हून प्रशासनाकडे ताबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले असले तरी ईदनंतर खरेच पाडापाडी होणार की नाही, याबाबत प्रशासनाने काहीही स्पष्टीकरण दिले नाही.