६५ वर्षांनंतर विद्यापीठाला महिला कुलगुरू मिळणार का? आज २४ जणांच्या मुलाखती

By राम शिनगारे | Published: November 29, 2023 05:29 PM2023-11-29T17:29:31+5:302023-11-29T17:30:05+5:30

कुलगुरूपदाच्या शर्यतीतील २४ जण, अंतिम पाचमध्ये जाण्यासाठी चढाओढ

Will the BAMU university get a woman vice-chancellor after 65 years? Interviews at IIT-Powai today | ६५ वर्षांनंतर विद्यापीठाला महिला कुलगुरू मिळणार का? आज २४ जणांच्या मुलाखती

६५ वर्षांनंतर विद्यापीठाला महिला कुलगुरू मिळणार का? आज २४ जणांच्या मुलाखती

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना २३ ऑगस्ट १९५८ रोजी करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत ६५ वर्षांमध्ये पूर्णवेळ तर नव्हेच, प्रभारी कुलगुरूपदाचा पदभारही महिला प्राध्यापकांना मिळालेला नाही. त्यामुळे मुंबईतील आयआयटी (पवई)मध्ये बुधवारी होणाऱ्या मुलाखतीत दोन महिलांपैकी कोणाची वर्णी अंतिम पाचमध्ये लागते, त्याकडे उच्चशिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मागील ६५ वर्षांमध्ये एकाही महिला प्राध्यापिकेला संधी मिळालेली नाही. राज्यातील विविध विद्यापीठांची कुलगुरूपदे महिला प्राध्यापिकांनी भूषविलेली आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरातील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी महिलेला संधी मिळालेली नाही. शोध समितीने कुलगुरूपदाच्या मुलाखतींसाठी २४ जणांना निमंत्रणे दिली आहेत. त्यातही केवळ दोन महिलांचा समावेश आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यमान परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी आणि वरिष्ठ प्रोफेसर ज्योती जाधव यांचा समावेश आहे.

बुधवारी सकाळी नऊ वाजता आयआयटी (पवई) येथे मुलाखतींना सुरुवात होईल. शोध समितीचे अध्यक्ष माजी शास्त्रज्ञ डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे हे आहेत. तर भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. जी. सुरेश, एमआयटी श्रीनगरचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे सदस्य तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे सदस्य सचिव आहेत. या समितीने पात्रताधारकांकडून २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान अर्ज मागविले होते. त्यात १०० जणांनी अर्ज केले. मुलाखतीसाठी यातील २४ जणांनाच आमंत्रित केले आहे.

अंतिम पाचमध्ये कोण जाणार?
२४ जणांच्या मुलाखतीनंतर शोध समिती त्यातील पाच जणांचा शिफारस कुलपती तथा राज्यपालांकडे करतील. त्या पाच जणांमध्ये जाण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राचे डॉ. सतीश पाटील, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी, डॉ. डी. के. गायकवाड आदींचे पारडे जड असल्याची चर्चा सुरू आहे.

कुलगुरूपदाच्या शर्यतीतील २४ जण
शोध समितीने कुलगुरूपदाच्या मुलाखतीसाठी बोलविलेल्या २४ जणांमध्ये प्रा. हिरेंद्र सिंग, प्रा. विलास खरात, प्रा. सतीश शर्मा, प्रा. राजीव गुप्ता, प्रा. सुभाष कोंडवार, डॉ. एस. के. सिंग, डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. विजय फुलारी, प्रा. संजय चव्हाण, प्रा. राजेंद्र काकडे, प्रा. भारती गवळी, प्रा. इंद्रप्रसाद त्रिपाठी, डॉ. अनिल चांदेवार, प्रा. ज्योती जाधव, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ. मनोहर चासकर, प्रा. राजेंद्र सोनकवडे, प्रा. उदय अन्नापुरे, प्रा. अशोक महाजन, प्रा. संदेश जाडकर, प्रा. राजू गच्छे, डॉ. संजय ढोले, डॉ. सतीश पाटील, प्रा. प्रमोद माहुलीकर यांचा समावेश आहे.

Web Title: Will the BAMU university get a woman vice-chancellor after 65 years? Interviews at IIT-Powai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.