फार्मसी विद्यार्थिनींचे अडीच वर्षांपासून कुलूपबंद वसतिगृह उघडणार का ?
By योगेश पायघन | Published: January 19, 2023 03:22 PM2023-01-19T15:22:34+5:302023-01-19T15:23:28+5:30
नवी दोन मजली इमारत अडगळीत : फर्निचर, सुरक्षा भिंत, देखभाल दुरुस्तीची गरज
- योगेश पायघन
औरंगाबाद : शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ३६ मुलींसाठी वसतिगृहाला मंजुरी मिळाल्यानंतर ते एका तपानंतर शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात पूर्णत्वास आले. मात्र, गेल्या अडीच वर्षांत फर्निचरसह सुरक्षा भिंत, पाण्याची व्यवस्था न झाल्याने हे वसतिगृह कुलूपबंद आहे. सरकारी काम बारा वर्षे थांब, अशा परिस्थितीत अडगळीत पडलेले हे वसतिगृह यावर्षी तरी विद्यार्थिनींना मिळावे, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे.
सन २००९ मध्ये १ कोटी ४२ लाखांचे वसतिगृह बांधण्याची परवानगी मिळाली. पूर्णत्वास येण्यास १२ वर्षे लागली. प्रत्येकी ३ मुलींच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या १२ खोल्यांचे दोन मजली इमारतीच्या हस्तांतरणासाठी सा. बां. विभागाकडून १९ ऑगस्ट २०२१ रोजी विचारणा झाली. मात्र, पिण्याचे पाणी, फर्निचर, सुरक्षा भिंत बांधल्यावरच ते ताब्यात घेऊ, असा पवित्रा महाविद्यालयाने घेतला. फर्निचरसह इतर साधन सामग्रीसाठी निधी मिळत नसल्याने महाविद्यालयाने स्वीय प्रपंची खात्यातून १४ लाखांच्या खर्चाची तयारी दर्शवली. मात्र, परवानगीच मिळाली नाही. सुरक्षा भिंत, पाणी साठवण्याच्या टाकीसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, अजून सा. बां. ने हे काम सुरू केले नसल्याने दोन मजली इमारत, रेक्टर हाउस तयार असतानाही सारे काही ठप्प आहे.
साैरऊर्जा पॅनलची दुरवस्था
मध्यंतरी काही महिन्यांसाठी विधी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना हे वसतिगृह देण्यात आले. विधी विद्यापीठाने त्यांनी फर्निचरसह इतर व्यवस्था केली. मात्र, त्या विद्यार्थिनी तेथून गेल्यावर ते कुलूपबंद आहे. गच्चीवरील सोलर पॅनल बंद पडले आहे.
वसतिगृह सुरु करा
मी नाशिकहून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी आले. जवळपास राहण्याची व्यवस्था नसल्याने मुलींना अडचणीचे होते. खर्च झेपत नाही. वसतिगृह सुरक्षिततेसाठी योग्य ठरेल.
- निकिता मोरे, बी. फार्मसी, प्रथम वर्ष विद्यार्थिनी
यावर्षी तरी वसतिगृह मिळावे
आठ वर्षांपासून तयार असलेले वसतिगृह अडगळीत पडले आहे. ते विरोधी पक्षनेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी या शैक्षणिक वर्षात विद्यार्थिनींना वसतिगृह उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. सा. बां. विभाग, तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहोत.
-डाॅ. रामप्रसाद नागरे, अध्यक्ष, डाॅक्टर ऑफ फार्मसी युनियन