छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’चे अपूर्ण मिशन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल?

By विजय सरवदे | Published: May 16, 2024 02:55 PM2024-05-16T14:55:18+5:302024-05-16T14:56:33+5:30

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.

Will the incomplete mission of 'Jaljeevan' be completed by September? Target to complete 629 schemes within four months | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’चे अपूर्ण मिशन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’चे अपूर्ण मिशन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड पडली आहे. टंचाईग्रस्त गावांसाठी सध्या ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली. परंतु, दोन वर्षांमध्ये अवघे ५३२ योजनांचीच कामे पूर्ण होऊ शकली. या मिशनसाठी आता सप्टेंबरपर्यंतची मुदत मिळाली असून, या चार महिन्यांत ६२९ योजनांची कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. यातील काही कामे जीवन प्राधिकरण, तर काही कामे जि.प.च्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. मागील दोन वर्षांपासून जि. प. पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनची कामे गतीने व्हावीत, यासाठी सातत्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केला. मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थ, सरपंच व कंत्राटदार यांच्यातील बेबनावामुळे अनेक कामे रखडली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे शस्त्रदेखील उगारले. ४५ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तरीही या मिशनसाठी असलेली मार्च २०२४ ची ‘डेड लाइन’ हुकली. अजूनही ६२९ योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत.

योजनांची कामे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक कुटुंबात दरमाणसी ५५ लीटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ८८२ घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत ३ लाख ९७ हजार ९०१ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नळाला कधी आठ दिवसांतून, तर अनेक ठिकाणी नळांना अद्याप पाणीच आलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मुदतीच्या आत कामे होतील
मार्च अखेरपर्यंत जलजीवन मिशन यशस्वी होऊ शकले नाही, हे खरे आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११६१ पैकी ५३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने या मिशनसाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत कामे करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प.

योजनांच्या कामांची सद्य:स्थिती
- ० ते २५ टक्के - ३७ कामे
- २५ ते ५० टक्के - १८६ कामे
- ५० ते ७५ टक्के - २१६ कामे
- ७५ ते १०० टक्के - १९० कामे
पूर्ण झालेली कामे - ५३२

Web Title: Will the incomplete mission of 'Jaljeevan' be completed by September? Target to complete 629 schemes within four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.